रुग्णालयांचा सीटी स्कॅन – ‘केईएम’च्या सुरक्षेचे ‘ऑडिट’च नाही! महिला डॉक्टरांना ‘डार्क’ स्पॉटची भीती

>>देवेंद्र भगत

मुंबई महानगरपालिकेच्या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक गर्दीच्या केईएम रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेमुळे काही वॉर्डसह ‘डार्क स्पॉट’ची भीती निवासी डॉक्टरांना जाणवत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून केईएम रुग्णालयाचे सुरक्षा ऑडिटच झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण केईएम रुग्णालयाच्या सुरक्षेचे ऑडिट करून पुरेशा प्रमाणात सिक्युरिटी गार्ड आणि ‘डार्क स्पॉट’वर लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, अशी माहिती निवासी, इंटर्न डॉक्टर्सकडून करण्यात येत आहे.

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येमुळे मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचंड गर्दीच्या रुग्णालयांत डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वपूर्ण ठरत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात  शिकाऊ, निवासी डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, सीनियर रेसिडंट असे सुमारे एक हजार डॉक्टर आहेत. या डॉक्टरांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी केईएमच्या आवारातील हॉस्टेलसह करी रोड, प्रभादेवी, शिवडी, लालबाग अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र केईएम रुग्णालयासह डॉक्टरांच्या राहण्याच्या इतर ठिकाणी रात्री-अपरात्री डय़ुटी करून परतत असताना किंवा डय़ुटीवर जाताना अंधरामुळे काही महत्त्वाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लाइट आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. शिवाय लिफ्टमध्येदेखील सीसीटीव्ही लावण्याची मागणीही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात सध्या 178 सुरक्षा गार्ड असून 30 ते 40 सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याचे समजते. शिवाय केईएम रुग्णालयाचा विस्तीर्ण परिसर आणि पाच ते सहा एन्ट्री गेट यामुळेही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

केईएम प्रशासन म्हणते…

केईएम रुग्णालयात सुमारे 520 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे कंट्रोल रूममध्ये नियंत्रण, रेकॉर्ड, बॅकअप ठेवला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शिवाय संपूर्ण परिसरदेखील सीसीटीव्हीच्या नजरेखाली असतो. तीन शिफ्टमध्ये 24 तास रुग्णालयात सिक्युरिटी उपलब्ध असते. महिला निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलबाहेरही सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा 24 तास पहारा असतो. महिला डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये कुणालाही सोडण्यात येत नाही.

सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका रखडल्या

n काही वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रसंगही निर्माण होत असल्याने डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. केईएममधील सुमारे 40 विविध प्रकारचे वॉर्ड असून काही ठिकाणी कायमस्वरूपी सिक्युरिटी नसते, तर ‘पेट्रोलिंग’ने नजर ठेवली जाते.

n त्यामुळे सर्व वॉर्डच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमा अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरावी, आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केईएम प्रशासनाने पालिका प्रशासनाकडे केल्याचे समजते. मात्र पालिका प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.