केंद्र सरकारने मला झेड प्लस सुरक्षा का दिली याबाबत कोणतीही कल्पना नाही. ही सुरक्षावाढ माझ्या निवडणूक दौऱ्याची खबर ठेवण्यासाठी असू शकते. निवडणूक कालावधीत ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्थाही सत्ताधाऱ्यांकडून झालेली असावी, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मला झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असल्याची माहिती गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला घरी येऊन दिली. त्यावेळी मी त्यांना सुरक्षा वाढीचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, सरकारने देशातील तीन व्यक्तींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये तुमच्यासह सरसंघचालक मोहन भागवत आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे. अचानक वाढवलेल्या सुरक्षासंदर्भात मी गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच सुरक्षा घ्यायची की नाही त्याबाबत निर्णय घेणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट करतानाच ही सुरक्षा वाढ माझ्या निवडणूक दौऱ्याची माहिती घेण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था असू शकते, असा संशयही व्यक्त केला. याप्रसंगी खासदार शाहू महाराज छत्रपती, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.