बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय म्हणणारे मुख्यमंत्री मिंधे विकृत, उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

बदलापूरमधील आंदोलन राजकीय होते असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड संतापले. त्या आंदोलनात राजकारण होते असे म्हणणारे मुख्यमंत्रीच विकृत आहेत, नराधमांचे पाठीराखे आहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दोन चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचार तुम्हाला मान्य आहे का, राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल करतानाच, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचाच पैसा जनतेला खिरापत म्हणून वाटण्यासाठी म्हणून ‘लाडकी बहीण’ योजना आणलीय तशी ही योजना नव्हती, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बदलापूरच्या घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला. बदलापुरात आगडोंब उसळला होता तरी मुख्यमंत्री रत्नागिरीत मिरवत होते. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बदलापुरात पोहोचायला हवे होते, पण लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून फिरत होते. त्या बंधनाला अर्थ आहे याचेही त्यांना भान नाही. राखी बांधताना भगिनी म्हणतात, दादा माझे रक्षण कर. पण तोच दादा जर दादागिरी करत असेल तर ती चिरडण्याची हिंमतही सर्व बहिणींमध्ये आहे हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

मुख्यमंत्री रत्नागिरीत डामडौलात बसले होते. कितीतरी गाडय़ा भरून तिथे गेले होते. बरेचसे मंत्री बरोबर होते. त्यांच्यासोबत गुलाबी जॅकेटही होते. हा काय फॅशन शो चाललाय का, अशी खिल्ली उडवतानाच, हे असंवेदनशील सरकार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झालाय, त्यांना फक्त जनतेच्या भावनांशी खेळता येते, अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे, गद्दार आहे आणि राज्य करताना जनतेच्या भावनांशीही गद्दारी करताहेत याचे दुःख होते, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.

 सरकारमध्ये बसलेल्यांना मुलेबाळे नाहीत का?

आंदोलकांच्या हाती लाडकी बहीण फलक होते. आंदोलनाचे राजकारण केले गेले, असा आरोप मिंध्यांकडून केला गेला. त्याचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. अमानुष घटनेचा निषेध करू नये का? एखाद्या घटनेचा निषेध करणे हे मिंध्यांना राजकारण कसे वाटायला लागले, असा प्रतिसवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती तेव्हाही सरकारने जबाबदारी झटकली होती. गाडीखाली कुत्रं आलं तरी तुम्ही राजीनामा मागाल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तर उद्धटपणे बोलले होते. म्हणजे सरकारला जनतेच्या जिवाची किंमत नाही. एखादी हत्या झाली तर त्याची बरोबरी गाडीखाली आलेल्या कुत्र्याशी करता मग या चिमुरडया मुलींची बरोबरी कुणाशी करणार, सरकारमध्ये बसलेल्यांना मुलेबाळे नाहीत का, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

आग लागो तुझ्या कारभाराला

आंदोलन करण्यापेक्षा आग लावली पाहिजे होती अशी प्रतिक्रिया बदलापूरच्या घटनेवर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली होती. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, गुन्हेगाराला वेळीच अटक केली असती तर जनतेचा उद्रेक झाला नसता. यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही तेव्हा असे घडते. मग त्यात राजकारण आणलेय असे म्हणणे आणि आंदोलन केलेय त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे असे बघितल्यानंतर आग लागो तुझ्या कारभाराला अशी प्रतिक्रिया येतेच.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेही काल बदलापुरात गेल्या होत्या. त्यांनी आंदोलन केले नसते तर महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणारा नालायक वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला असता, का तो सुटला असता? ज्यांच्या मुली त्या शाळेत शिकताहेत त्यांच्या पालकांचा तो एकत्रित उद्रेक होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दबावाखाली काम करणारे पोलीसही गुन्हेगार

बदलापूरच्या त्या शाळेचे संस्थाचालक भाजपचे पदाधिकारी आहेत म्हणून गुन्हा दाखल करण्यास वेळ झाला याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरही निशाणा साधला. आपल्या कार्यक्षेत्रात काय चाललेय याची माहिती पोलीस आयुक्तांना असायला हवी. पोलीस आयुक्त डुंबरे यांच्यावर दबाव होता की नव्हता हे त्यांनी सांगायला हवे. कारण दबावाखाली काम करणारे पोलीसही तितकेच गुन्हेगार आहेत, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि पोलिसांवर दबाव आणणारेही गुन्हेगारच आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे नराधमांचे सरकार आहे का?

हायकोर्टानेही बदलापूरमधील घटनेची आज गंभीर दखल घेत पोलीस आणि सरकारच्या दिरंगाईवर ताशेरे ओढले. त्यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की,  मुलीची आई गर्भवती आहे. तिलाही पोलिसांनी दहा-बारा तास खोळंबून ठेवले. तिला ताप भरल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. मग हे कोणाचे सरकार आहे? हे नराधमांचे सरकार आहे का, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बदलापुरात जाणार

बदलापूरमधील पीडित कुटुंबियांशी आपला संपर्क झाला होता. त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायलाही जरूर जाईन पण आता सध्या त्यांना त्रास देऊ इच्छित नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शक्ती विधेयक नको म्हणून सरकार पाडले अशी शंका येतेय

महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या शक्ती विधेयकाचे काय झाले असा मुद्दाही यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, निर्भयानंतर हाथरस आणि उन्नावमध्ये अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. तिथेही पोलिसांनी परस्पर मृतदेह जाळून टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. अशा घटनांविरुद्ध काही काळाकरिता उद्रेक होतो. पण नंतर आपण झोपून जातो आणि पुन्हा तशा घटना घडतात. आता आलेली जाग जाऊ देता कामा नये. अशा घटना रोखण्यासाठीच आम्ही शक्ती विधेयक आणत होतो. पण अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. शक्ती विधेयक आणू नये म्हणून सरकार पाडले की काय, अशी शंका येतेय असेही उद्धव ठाकरे म्हणाले. विधेयकात काही सुधारणा असतील तर त्या लवकरात लवकर करून ते लागू करायला हवे असेही ते म्हणाले.

सरकारला जनतेच्या जिवाची किंमत नाही. एखादी हत्या झाली तर त्याची बरोबरी गाडीखाली आलेल्या कुत्र्याशी करता, मग या चिमुरडय़ा मुलींची बरोबरी कुणाशी करणार? सरकारमध्ये बसलेल्यांना मुलेबाळे नाहीत का?

गुन्हेगाराला वेळीच अटक केली असती तर जनतेचा उद्रेक झाला नसता. यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही तेव्हा असे घडते. मग त्यात राजकारण आणलेय असे म्हणणे आणि आंदोलन केलेय त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे असे बघितल्यानंतर आग लागो तुझ्या कारभाराला!

घणाघात

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतो… थोडय़ा दिवसांचे मेहमान आहात. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्याच ठाण्यात राहायचेय. तेव्हा सर्व बहिणी जाब विचारायला येतील. तू मुख्यमंत्री होतास, गद्दारी करून मुख्यमंत्री झालास, तू आमचे रक्षण केले नाहीस, उत्तर दे.

मुख्यमंत्री म्हणाले फाशी दिलीअरे कोणाला दिली, त्याचीच एसआयटी चौकशी करा

दोन महिन्यांपूर्वी अशाच घटनेप्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी केली गेली आणि त्यातील गुन्हेगाराला फाशी दिली गेली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर घटनेप्रकरणी एसआयटीची घोषणा करताना केला. त्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी, ती नेमकी कोणती घटना होती आणि कोणाला फास्ट ट्रकवर केस चालवून फाशी दिली त्याचीच एसआयटी चौकशी करा, असा टोला लगावला.

बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहीण योजना आणता येतात

सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. आपल्या राज्यात मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली गेली आहे. हे चांगले असले तरी मुली शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आयेंगे

‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आयेंगे’, या कवी पुष्यमित्र उपाध्याय यांच्या कवितेचा दाखला देत ही कविता आजच्या परिस्थितीवर चपखल बसणारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शस्त्र उठा लो आपण सांगतोय. पण आईच्या कडेवर असलेल्या पोरीला शस्त्र काय हेच माहीत नाही. ती वाचणार कधी कवित़ा? ती शिकणार कधी? म्हणूनच आपण तिला शाळेत पाठवतोय. पण कडेवरच्या मुलींवरच अत्याचार होतोय. त्या घाबरून गप्प बसताहेत. त्यांच्यावर अत्याचार होतोय हे कळूनही जर पोलीस आणि प्रशासन ढीम्मपणे वागणार असतील तर जनतेने करायचे काय, अशी उद्विग्नताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.