जगभरातून महत्वाच्या बातम्या

समुद्रावर धावणार सुस्साट रेल्वे…

तामीळनाडूमधील रामेश्वर येथे बनवण्यात आलेल्या देशातील पहिल्या व्हर्टिकल रेल्वे सी-ब्रिजवर गुरुवारी ट्रेनची चाचणी घेण्यात आली. पंबन सी ब्रिजचे काम 2019 पासून सुरू होते. ते आता पूर्ण झाले असून लवकरच या मार्गावरून सुस्साट रेल्वे धावताना दिसणार आहे.

चीनने लाँच केली अत्याधुनिक पाणबुडी

चीनने आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक पाणबुडी लाँच केली आहे. ही पाणबुडी वर्टिकल लाँच सिस्टमने परिपूर्ण आहे. स्टील्थ तंत्रज्ञानाने तयार केलेली ही पाणबुडी पाण्याच्या खालून कोणत्याही रडारच्या मदतीने शोधणे सोपे नाही. शत्रूची जहाजे आणि पाणबुडय़ा क्षणार्धात बुडवून टाकण्याची तिची क्षमता आहे. अत्याधुनिक पाणबुडी लाँच करून चीनने समुद्रातील ताकद वाढवली आहे. चीनने कोणताही गाजावाजा न करता नवीन पाणबुडी लाँच केली.

टीव्हीके पक्षाच्या झेंडय़ाचे अनावरण

तमीळ अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) चा प्रमुख थलापती विजय याने गुरुवारी चेन्नई येथील पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नव्या पक्षाच्या झेंडय़ाचे अनावरण केले. विजयचा पक्ष आगामी 2026 ची तामीळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार आहे. या वेळी विजयने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मला खूप अभिमान वाटत आहे. तामीळनाडूच्या विकासासाठी आपण एकत्र मिळून काम करुयात, असे विजय म्हणाला.

ऑडी क्यू-8चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच

ऑडी क्यू-8चे फेसलिफ्ट व्हर्जन हिंदुस्थानात लाँच करण्यात आले. या कारची एक्स शोरूम किंमत 1 कोटी 17 लाख 49 हजार रुपये आहे. 5 लाख रुपये मोजून या कारला बुकिंग करता येऊ शकते. या कारची टक्कर हिंदुस्थानात मर्सिडीज जीएलएस, बीएमडब्ल्यू एक्स-7 आणि वोल्वो एक्ससी-90 या कारसोबत होईल. या गाडीत 3.0 लिटर व्ही-6 टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन-8 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सशी जोडले आहे.

पाकिस्तानात 700 कर्मचाऱ्यांना डच्चू

इस्लामाबाद येथील फेमस रेस्टॉरंट मोनालला बंद करण्याची सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर 700 कर्मचाऱ्यांची नोकरी एका झटक्यात गेली. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या अखेरच्या दिवशी अक्षरशः टाहो पह्डला. कर्मचाऱ्यांचा रडतानाचा व्हिडीओ आणि पह्टो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर हे रेस्टॉरेंट बंद केले जात आहे. 2006पासून हे हॉटेल इस्लामाबाद येथे सुरू होते.

एअर इंडिया विमानात बॉम्बची अफवा

मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर पायलटने बॉम्बची माहिती दिली. या  विमानात एपूण 135 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. विमानाची कसून तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले. यापूर्वी जूनमध्ये तीन आणि मे महिन्यात दोन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती.