चांद्रयान-4 आणि 5 चे डिझाईन तयार असून पुढच्या पाच वर्षांत अवकाशात तब्बल 70 उपग्रह सोडण्याचे ध्येय असल्याचे इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. पुढच्या चांद्रयान मोहिमेसाठीची मंजुरी सरकारकडून अद्याप मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच पुढच्या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. चांद्रयान 4 च्या मोहिमेदरम्यान अंतराळ यानाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येईल. यात सॉफ्ट लॅण्डिंग होणे महत्त्वाचे असेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्पेस डॉकिंग हे अतिशय आव्हानात्मक काम असेल. त्यानंतर यान अंतराळातच जोडले जाईल. अशाप्रकारची मोहीम इस्रो पहिल्यांदाच पार पाडणार असल्याचेही डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानी अंतराळ संघटनेच्या ऑल इंडिया काऊन्सेलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्रो अध्यक्षांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
इस्रोकडे अनेक मोहिमा
चांद्रयान-3 नंतर इस्रोकडे अनेक अंतराळ मोहिमा असल्याचे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले. याआधी इस्रोच्या अधिकाऱ्यांनी चांद्रयान-4 ही मोहीम 2028 मध्ये सुरू करण्यात येईल असे म्हटले होते, परंतु आता इस्रोप्रमुखांनीच लवकरात लवकर पुढील चांद्रयान मोहिमा सुरू करण्यात येतील. कारण चांद्रयान-4 आणि 5 चे डिझाईन तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इन्सॅट 4 डी वेदर सॅटेलाइट, रिसोर्ससॅट, कार्टोसॅट सॅटेलाईट अशाप्रकरचे तब्बल 70 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.