Ratnagiri News – …नाहीतर आमच्या जमिनी परत करा; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वाडवडिलांपासून कसत असलेल्या जमीनी अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतल्या मात्र आजतागायत त्या जागेवर प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात किंवा जमिनीचा आजच्या बाजारभावाने मोबदला मिळावा अशी मागणी करत, रत्नागिरी अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

सन 1967 साली  सरकारने बाल्को या कंपनीमार्फत अॅल्युमिनियम प्रकल्प करण्याचे निश्चित केले होते. जर्मन कंपनीच्या सहयोगाने हा कारखाना रत्नागिरीत करण्याचे ठरले होते. या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील जमीनी सरकारने कवडीमोल दराने घेतल्या. 40 रुपये प्रतिगुंठा अशा दराने सरकारने जमीनी विकत घेतल्या. रोजगार उपलब्ध होईल म्हणून शेतकऱ्यांनी जमीनी विकत दिल्या. मात्र आजतागायत त्या बाराशे एकर जमीनीवर प्रकल्प उभा राहिला नाही. प्रकल्प उभा न राहिल्यामुळे त्या जमीनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या मागणीसाठी रत्नागिरी अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी एकवटले. त्या जमीनी परत करा किंवा आजच्या बाजारभावाने त्या जमीनीचा मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार बाळ माने, अध्यक्ष राजेंद्र आयरे, अॅड अश्विनी आगाशे, उमेश खंडकर आणि इतर शेतकरी उपस्थित होते.