रत्नागिरीतील पाली नजीकच्या पाथरट येथील धाडवेवाडीतील इंदिरा शांताराम धाडवे या वृद्धेवर गुरुवारी (ता.22) सकाळच्या सुमारास घरानजीकच्या सार्वजनिक शौचालयात जाताना तेथे बाजूला दडून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
या बिबट्याच्या हल्ल्याबाबत घटनास्थळावरून व पाली वन कार्यालयातून मिळालेली माहिती अशी की, पाली नजीकच्या पाथरट येथील धाडवेवाडीतील इंदिरा शांताराम धाडवे (वय 75 ) या सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरा नजीकच्या सार्वजनिक शौचालयास जाण्यासाठी हातात बॅटरी घेऊन निघाल्या होत्या. त्यावेळी तेथे बाजूला दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी घाबरून आरडाओरड केल्यावर तेथे जवळच असलेला त्यांचा मुलगा सुभाष धाडवे याने चुलीतील लाकडाने त्या बिबट्याला मारून परतवून लावले. यावेळी बिबट्याशी झालेल्या झटापटीत इंदिरा धाडवे यांच्या डोक्याला, उजव्या खांद्याला व मानेला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांच्यावर उपचारकेले.