‘महाराष्ट्र बंद’ हा उद्दाम सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज येवला आणि मनमाडमध्ये जाहीर सभा झाल्या. या सभेत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-मिंधे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन, एकजुटीने लढावं लागेल. भाजप-मिंधे सरकारला ह्या महाराष्ट्रातून हद्दपार करत नाही तोपर्यंत आपली लढाई संपणार नाही, ह्याचा पुनरुच्चार आज येवला येथे झालेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभेत’ आदित्य ठाकरे यांनी केला. 24 ऑगस्ट रोजी होणारा ‘महाराष्ट्र बंद’ हा उद्दाम सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी असून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिक आणि जनतेला केले.

‘हिंमत असेल तर आत्ताच वाढीव रक्कम द्या’

शेतकऱ्यांना मदत द्या, ही मागणी आपण सतत करत होतो. इथे तर बघायला तयार नाहीत. पण आता नवीन कुठेतरी गाणं गाताहेत लाडकी बहीण… लाडकी बहीण. इथे अनेक महिला आलेल्या आहेत. कदाचित आपल्या खात्यात आणखी दीड हजार रुपये टाकतील. आणखी एखादा हप्ता देतील. आम्ही सरकार आल्यानंतर हा निधी वाढवून, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री आज सांगत आहेत. जे 2014 मध्ये 15 लाखांबद्दल बोलत होते. पंतप्रधान बोलले होते 15 लाख रुपये सर्वांच्या खात्यात देऊ. ते 10 वर्षांनंतर आता 15 लाखांवरून 1500 वर आलेले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 15 लाख बोलणारे आता 1500 आले आहेत. पंधराशेसाठीही अटी शर्ती एवढ्या टाकलेल्या आहेत अर्ध्या महिला त्यात येणार नाहीत. अजून काही अटी-शर्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे जेवढ्या महिला निवडणुकीपर्यंत येतील. निवडणुकीनंतर हे खोके सरकार तुम्हाला आणखी कमी करण्याचा प्रयत्न करेल. आता सांगताहेत वाढीव पैसे देऊ. पण नंतर पैसेच नाही, असे सांगतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो. तुमचं सरकार तर येतच नाही. हिंमत असेल तर आत्ताच वाढीव रक्कम द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी भाजप-मिंधे सरकारला दिले. आमचं सरकार येणार आहे. आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही रक्कम वाढवून आमच्या बहिणीला देणार, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.

आज लाडक्या बहिणींना फक्त मदत नकोय, फक्त मदत नकोय, फक्त आधार नकोय तर सुरक्षा देखिल पाहिजे. आज हा प्रश्न देशात आणि महाराष्ट्रात गंभीर झालेला आहे. आणि म्हणूनच 24 ला परवा दिवशी आपण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. बदलापूरची घटना पाहिलीच आहे. तीन-चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले. पण पोलीस स्टेशनने पाच सहा दिवस होऊनही एफआयआरची नोंद करून घेतली नाही. कोणाचा दबाव होता, कोणाची शाळा होती? आपटे नावाचे ट्रस्टी आहेत, ते का बोलत नाही? मीडियासमोर का येत नाहीत? भाजपवाल्याची शाळा होती. म्हणून तुम्ही त्या शाळेला वाचवायचा प्रयत्न करताय. त्या शाळेला वाचवण्याच्या प्रयत्नात गरोदर महिलेला पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावता. सहा-सहा दिवस एफआयआर घेत नाही. एफआयआर घेतली त्या दिवशी त्या गरोदर महिलेला १० तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं होतं. असे भाऊ खरोखर तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? असलं सरकार तुमचं लाडका भाऊ होऊ शकतो का? नाही होऊ शकत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी घणाघात केला.

न्याय हक्कासाठी ज्यांनी आंदोलन केलं, ज्या तीन आणि चार वर्षांच्या मुलींसाठी आंदोलन केलं त्या 300 लोकांना अटकेत घेतलं. त्यांच्यावर पाच मिनिटांत एफआयआर टाकली गेली. त्यांना अटक झाली. हे भाजप-मिंधे सरकार तुमचा लाडका भाऊ असू शकतं का? हा सवाल आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मिंधेचे तिथे नेते, स्थानिक गँग लीडर आहेत वामन म्हात्रे नावाचे महिला पत्रकारालाच त्यांनी विचारलं, तू का एवढं रिपोर्टींग करतेस, जसं तुझाच रेप झालाय, तुझ्यावरच बलात्कार झालाय का? असं म्हणाला. हे लाडके भाऊ असू शकतात का तुमचे? हे कदापि आले लाडके भाऊ होणार नाहीत. जे आपल्या सुरक्षेसाठी उभे राहू शकत नाहीत, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

हे आंदोलन महिलेसाठी, लहान मुलींसाठी आणि अत्याचाराविरोधात नव्हतं तर राजकीय आंदोलन होतं, असं भाजपचे किसन कथोरे नावाचे आमदार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे स्वतः टीव्हीवर येऊन सांगतात. हा निर्लज्जपणा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आला कधी? दोन वर्षापूर्वी निर्लज्ज सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आपण हटवल्याशिवाय थांबायचं नाही. ही शपथ आपल्या लाडक्या बहिणींनी घेतली पाहिजे, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी येवल्यातल्या सभेत केलं.

मनमाड येथे झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधला. संविधान वाचवण्यापासून सुरू झालेली ही लढाई आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई झाली आहे. शिवसैनिकांचा निर्धार आणि जनतेची वज्रमूठच आगामी निवडणुकीत भाजप-मिंधे राजवट हद्दपार करणार! असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

ज्या घटना महाराष्ट्र घडताहेत त्या आपण पाहतोय. बदलापूरमध्ये, नाशिकच्या सिन्नरमध्ये, साताऱ्यातही अशी घटना घडली आहे. बदलापूरची घटना ही एवढी दुर्दैवी आणि विचित्र घटना आहे. त्या बलात्कारी आणि अत्याचाऱ्याला महिलांमध्ये सोडून द्या. महिलांनाच त्याचा न्यायनिवडा लावू द्या, मग जनता ठरवेल कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे. एक आठवडा निघून गेला. तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर ज्या शाळेत अत्याचार झाले ती शाळा भाजपच्या एका व्यक्तीची होती. एक आपटे नावाच्या व्यक्ती होता. म्हणून त्या शाळेला वाचवण्यासाठी एफआयआरची नोंद घेऊ नका यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव होता. मग हा तुमचा लाडका भाऊ असू शकतो का? जाहीर निषेध काय कितीही निषेध केला तरी कमीच आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारावरून जोरदार हल्ला म केला.