पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काहीच आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी होत असल्याने माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. स्थानिक नेत्यांनी पक्षांतर्गत दुही माजवली आहे. मनमानी कारभारामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून, पदाधिऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. या पत्रामुळे भाजपमधील गटबाजी किती शिगेला गेली आहे, हे यावरून दिसून येत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मंगळवारी (दि.२०) प्रवेश केला. त्यानंतर भाजपला लागलेल्या या गळतीबाबत थोरात यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असताना भोसरी येथील दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भारतीय जनता पार्टी शहरात रुजवली. भाजपाचे तत्कालीन शहराध्यक्ष असलेल्या लांडगे यांनी शहरात पक्षाचे कार्यकर्ते तयार केले. विपरीत परिस्थितीत भाजपाचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले. आज त्यांच्याच घरातील सदस्यांना पक्ष सोडण्याची वेळ येत आहे.
सद्यः परिस्थितीत भाजपमध्ये आयारामांची गर्दी झाली असून, अनेकांना महत्त्वाची पदे दिली. पदांचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर सुरू आहे. अंतर्गत गटबाजी करून पक्षामध्ये दुही माजवली जात असल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे. त्याला कंटाळून पदाधिकारी पक्ष सोडत आहेत. रवि लांडगे यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाही. त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू होता. शहरातील पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढविण्याऐवजी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला. त्यामुळे स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी. जेणेकरून पक्षातून बाहेर पडून कोणीही इतर पक्षांमध्ये जाणार नाही. अन्यथा, भाजपला लागलेली गळती ही केवळ स्थानिक नव्हे तर इतरही निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरेल, असे थोरात यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, भोसरीतील पक्षाच्या कार्यक्रमाच्या कोणत्याही फलकांवर शहराध्यक्षांचे छायाचित्र टाकले जात नाही. त्यामुळे पक्षाच्या चिटणीसानेच आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून भाजपमध्ये समन्वय नसल्याची कबुली शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.