
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 79.50 टक्के नागरिक साक्षर आहेत. त्यापैकी 57 टक्के पुरुष आणि 43 टक्के महिला साक्षर असल्याचे महापालिकेच्या सन 2023- 24 च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेला 2023- 24 या वर्षाचा अहवाल आयुक्त शेखर सिंह यांना सादर करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल आदी उपस्थित होते.
अहवालानुसार पिंपरी-चिंचवड शहरात सन 2022- 23 मध्ये कमाल 497.2 मिलिमीटर तर किमान 1.5 मिलिमीटर इतके पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. सन 2022- 23 मध्ये शहराचे सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअस, तर किमान 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धूलिकण, अतिसूक्ष्म धूलिकणांची पातळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार विहित मर्यादेमध्ये असल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. धूलिकणाचे प्रमाण हे सणासुदीच्या काळात विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील पाणीपुरवठा, जलनिःसारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. पर्यावरण सद्यः स्थिती अहवाल महत्त्वपूर्ण आहे. शहराच्या शाश्वत तसेच पर्यावरणपूरक विकासासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरेल.
अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.