
फुटबॉलच्या मैदानात विक्रमांचे गोल रचणारा पोर्तुगालचा सुपरस्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे जगभरात लाखो चाहते आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूमध्ये त्याचा समावेश होतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. त्याच्याशी संबंधीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न असतो. रोनाल्डोही प्रत्येक गोष्टीचे अपडेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतो. इन्स्टा, ट्विटर, फेसबूकवर त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स असून आता त्याने स्वत:चे युट्यूब चॅनेलही सुरू केले आहे. हे चॅनेल सुरू होताच रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्यावर उड्या घेतल्या असून अवघ्या 5 तासांमध्ये 50 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एक युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. हे चॅनेल सुरू होताच चाहत्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. पहिल्या दीड तासामध्ये जवळपास 1 मिलियन लोकांनी हे चॅनेल सबस्क्राईब केले. मात्र पुढील साडे तीन तासांमध्ये आणखी 4 मिलियन लोकांनी हे चॅनेल सबस्क्राईब करत विक्रम केला. भल्याभल्या सेलिब्रिटींची हा आकडा गाठताना दमछाक होती. मात्र रोनाल्डोने आपल्या लोकप्रियतेच्या बळावर अवघ्या काही तासांमध्ये हा कारनामा केला.
रोनाल्डो जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडा फुटबॉलपटू आहे. 39 वर्षीय रोनाल्डोने 2003 पासून पोर्तुगालच्या संघाचे प्रतिनिधित्व करत असून आतापर्यंत त्याने 212 लढतीत 130 गोल केले आहेत. पोर्तुगाल व्यतिरिक्त त्याने मॅनचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद, जुवेंट्स सारख्या व्यावसायिक फुटबॉल संघाचेही प्रतिनिधित्व केले असून सध्या तो अल नसार या क्लबकडून खेळतो.
दरम्यान, रोनाल्डो याचे एक्स (ट्विटर) अकाऊंटवर 112.5 मिलियन, फेसबुकवर 170 मिलियन आणि इन्स्टाग्रामवर तब्बल 636 मिलियन फॉलोअर्स आहेत. यात आता त्याच्या युट्यूब चॅनेलचीही भर पडली आहे. अवघ्या काही तासात या चॅनेलचे लाखो सबस्क्राईबर्स झाले असून आगामी काळामध्ये इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे तिथेही कोट्यवधी सबस्क्रायबर्स होतील अशी शक्यता आहे.