
राजीव गांधी ई-लर्निंग ही आदर्श शाळा असून, देशातील सर्व सरकारी शाळा अशा झाल्या पाहिजेत व संविधानाने दिलेले आपले हक्क व कर्तव्य याची जाण शिक्षण अवस्थेत असताना विद्यार्थ्यांना व्हावी तसेच मातृभाषेबद्दल जिव्हाळा वाढावा याकरिता आमचे सरकार येताच याचा अभ्यास अनिवार्य करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पंतप्रधान स्व. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलला १३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अंकुश काकडे, कमल व्यवहारे, अभय छाजेड, चंदू कदम, अविनाश बागवे, मुख्तार शेख, जयंत किराड, सौरभ अमराळे, जयश्री बागुल, आशा उबाळे, जामुवंत मसलकर, रूपाली कदम, अश्विनी ताटे आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, राजीव गांधी ई- लर्निंग ही महानगरपालिकेची आदर्श शाळा आहे. समाजात वावरत असताना समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाची गरज असते. या शाळेतील विद्यार्थी नासामध्ये काम करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. चांगले लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांनी एकत्र काम केल्यावर अशा प्रकारची चांगली वास्तू तयार होते. याचे मूर्तिमंत उदाहरण ही शाळा आहे. अशा प्रकारच्या शाळा संपूर्ण राज्यात करण्याचे काम आम्ही करू. नुकत्याच बदलापूर व पुण्यात झालेल्या घटनेचा निषेध करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुलींसह मुलांनाही गुड टच व बॅड टच शिकवला पाहिजे. स्त्रीचा सन्मान करण्यास लहानपणापासूनच धडे दिले पाहिजे आणि अशा सामाजिक प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.
महेश झगडे म्हणाले, खासगी शाळेतील मुले ही सरकारी शाळेकडे वळली पाहिजेत. शिक्षण आणि आरोग्य यातील सुरू असलेले विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
उल्हासदादा पवार म्हणाले, अनेक लोकांना विश्वास वाटत नव्हता की येथे अशाप्रकारे शाळा उभी होईल. शाळेतील विद्यार्थी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधताना पाहून या शाळेच्या माध्यमातून राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी केले.
पर्वती काँग्रेसला द्या
यावेळी सभागृहात पर्वती ब्लॉक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला द्या आणि आबा बागुल यांना आमदार करा, अशा घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपला पराभूत करायचे असेल, प्रस्थापितांना घरी पाठवायचे असेल तर आबा बागुल यांच्याशिवाय या मतदारसंघात पर्याय नाही. त्यामुळे आता ‘आबां’ना आमदार करा, अशी एकमुखी मागणी सर्वांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केली.