मुंबईतील गँगवॉर संपविण्यात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता असे एकेकाळचे मुंबई क्राइम ब्रॅचमधील अधिकारी निनाद सावंत, महेश तावडे, कलिम शेख, संजय गोविलकर यांच्यासह 82 पोलीस निरीक्षकांना अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून शासनाने बढती दिली आहे.
फौजदार म्हणून राज्य पोलीस दलात भरती झालेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला आपण सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त व्हावे असे वाटते. परंतु सरकारी बाबूंच्या अनागोंदी कारभारामुळे कधीही वेळेत बदल्या व बढत्या होत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडते. सहाय्यक आयुक्त होण्याआधीच ते निवृत्त होतात. या वर्षीही अनेकांना बढतीविनाच निवृत्त व्हावे लागले. काहींना एक दिवस अगोदर, तर काहींना निवृत्त होण्याच्या एक तास अगोदर एसीपीपदी बढती मिळाल्याचे पत्र हातात पडले.
मुंबईत गँगवॉर वाढले असताना ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून अंडरवर्ल्डशी सामना केला, अंडरवर्ल्ड नियंत्रणात आणले असे महेश तावडे, निनाद सावंत, कलिम शेख तसेच पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद कसाबला जिवंत पकडणारे संजय गोविलकर हे गेल्या वर्षभरापासून बढतीच्या प्रतीक्षेत होते. आपणास एसीपी म्हणून बढती मिळेल की नाही अशी त्यांना शंका वाटत होती. अखेर बढतीचे मंगळवारी पडघम वाजले. 20 ऑगस्ट रोजी 82 निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश जारी झाले. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ, सुभाष बोराटे, शशांक शेळके, किशोर कुमार शिंदे, राजेश ओझा, सायरस इराणी, संदीप भागवत, रेणुका बुवा, युसूफ सौदागर, सुमन चव्हाण, प्रिनाब परब, संभाजी मुरकुटे, सुधीर खेडेकर, सुधाकर शिरसाट या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.