बदलापूर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे संतप्त पडसाद आज राज्यभरात उमटले. लाडक्या लेकाRची सुरक्षा करण्यात षंढ ठरलेल्या मिंधे सरकारचा शिवसेनेने ठिकठिकाणी उग्र आंदोलन करून तीव्र निषेध केला. ‘आंधळे, बहिरे महायुती सरकार… महिलांवर होताहेत अत्याचार’ असे फलक दाखवून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारला बांगडय़ांचा आहेर भेट दिला. चिमुरडय़ांवरील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही यावेळी सरकारचा धिक्कार करण्यात आला.
बदलापूरच्या घटनेने तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडेच निघाले आहेत. त्यामुळे जनतेत प्रचंड चीड आणि संताप असून ही खदखद आज शिवसेनेच्या आंदोलनातून बाहेर आली. संतप्त निदर्शने, मूक मोर्चा काढत शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मुंबईत शिवसेना भवनासमोर तसेच गिरगाव, लालबाग, चेंबूर, मुलुंडसह ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन केले. ‘आरोपीला फासावर लटकवा’, ‘गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे’ असे फलक हाती घेत काळ्या पट्टय़ा बांधून आणि काळे झेंडे फडकावत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.
पुण्यात शिवसेनेकडून जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. ‘भीक नको दीड हजाराची, खात्री हवी सुरक्षिततेची’ अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र आंदोलन करत संताप व्यक्त केला.
‘लाडकी बहीण’ रश्मी शुक्ला यांना दीड हजार रुपयांचा धनादेश
लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण हवी, असे नमूद करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन दिले. यावेळी महासंचालक ताईंना लाडकी बहीण योजनेचा दीड हजारांचा प्रतीकात्मक धनादेश देत महिलांचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
एफआयआरसाठीही आता आंदोलने करावी लागणार का?
बदलापूरमध्ये दोन चिमुरडय़ांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर न्यायासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागले. हे संतापजनक आहे, असे नमूद करत आता एफआयआर दाखल करण्यासाठीही आंदोलने करावी लागणार का? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात ही लोकांनी अन्यायाच्या विरोधात व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया होती. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही, त्यांना बदल हवाय, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.