जयदेव उनाडकट पुन्हा काऊंटी क्रिकेट खेळणार

देशांतर्गत क्रिकेटमध्ये भन्नाट गोलंदाजी करणाऱया जयदेव उनाडकटने पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग दुसऱ्या हंगामात ससेक्सकडून खेळताना दिसणार आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये शेवटच्या पाच सामन्यांसाठी तो क्लबच्या संघात सहभागी होईल. या क्लबमध्ये चेतेश्वर पुजाराचाही समावेश आहे. हे दोघेही क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळतात. 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 32 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटची निवड केलेली नाही. चार संघांसाठी निवडलेल्या 50 हून अधिक खेळाडूंमध्ये उनाडकटला स्थान देण्यात आले नाही. अशा परिस्थितीत त्याने इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जयदेव उनाडकटने गेल्या काऊंटी हंगामात ससेक्सकडून तीन सामने खेळले आहेत. या काळात त्याने पाच डावांत 86 षटके टाकली असून, 11 बळी टिपले आहेत. एका डावात 94 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. उनाडकट या हंगामात आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल, अशी ससेक्स क्लबला आशा आहे.