आयटीआर व्हेरिफिकेशनसाठी उरले 10 दिवस, रिफंडकडे लागल्या करदात्यांच्या नजरा

आयकर विभागाच्या माहितीनुसार, या वर्षी 31 जुलै 2024 पर्यंत सुमारे 7.28 कोटी आयटीआर फाईल झाले आहेत, त्यापैकी 5 कोटी आयटीआर 26 जुलैपर्यंत फाईल झाले. उर्वरित सुमारे 2.28 कोटी आयटीआर 27 ते 31 जुलैदरम्यान दाखल करण्यात आले होते. अशात नियमांनुसार, 26 जुलै ते 31 जुलैदरम्यान दाखल आयटीआरची डेडलाइन 26 ते 30 ऑगस्टदरम्यानची आहे. त्यामुळे त्या करदात्यांकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दंड लागू नये यासाठी करदात्यांना घाई करावी लागणार आहे. आयकर नियमांनुसार, आयटीआर फाईल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशनसाठी किंवा ‘आयटीआर 5’ ऑफलाइन जमा करण्यासाठी एकूण 30 दिवसांचा वेळ दिला जातो. आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टपर्यंत एकूण 7 कोटी 41 लाख 37 हजार 596 आयटीआर फाईल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 7 कोटी 9 लाख 89 हजार 14 आयटीआर व्हेरिफाय झालेले आहेत. म्हणजे 32 लाख करदात्यांचे आयटीआर व्हेरिफाय झालेले नाहीत.

5 हजारांचा दंड

30 दिवसांच्या आत आयटीआर व्हेरिफिकेशन केले नाही तर रिफंड मिळणार नाही. तुमचे आयटीआर रद्द होईल. तुम्हाला पुन्हा आयटीआर फाईल करावा लागेल आणि त्यावर लेट फायलिंगचा दंड भरावा लागेल. हा दंड एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असू शकतो.