आमचे सरकार आल्यावर बहिणींना वाढीव रकमेसह, सुरक्षाही देऊ; आदित्य ठाकरे यांची ग्वाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा झाली. या सभेत त्यांनी तडाखेबंद भाषण केले. स्वराज्याचा स्वाभिमान जपूया, महाराष्ट्रधर्म वाढवूया!, असे या सभेचे ब्रीद होते. या सभेत आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बहिणींना वाढीव रक्कम देण्यात येईल, तसेच बहिणींना सुरक्षाही पुरवण्यात येईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

कार्यकर्ता मेळाव्याची आपली सुरुवात नाशिकमधून होत आहे. सत्कार खासदारांचा आणि शिवसैनिकांचा झाला पाहिजे. ही लोकसभा निवडणूक निर्णायक होती. अनेक मेळावे, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भेटीसाठी आपण नाशिकमध्ये आलो आहोत. प्रत्येकवेळी नवी प्रेरणा आणि नवी ताकद मिळते. आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही, अडवू शकत नाही आता महाराष्ट्र आणि राज्यातील जनता आपल्यासोबत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकसभेत आपण मोठा विजय मिळवला आहे. आपण या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांच्यासोबत जनता उभी राहिली आणि ते विजयी झाले, यासाठी सर्वांचे अभिनंदन करावे लागेल. ही साधी,रळ,सोपी निवडणूल नव्हती. ही एक लढाईच होती. सर्वात जास्त बाँड, यंत्रणा, ईडी, सीबीईय, इन्कमटॅक्स आणि 10 वर्षांची सत्तेची शक्ती आपल्यासमोर होती. तर आपल्यासोबत जनता होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि शिवसेनाप्रमुखांचे आशिर्वाद होते. जनतेने भाजपला दाखवून दिले, या देशात हुकूमशाही, सैराचार चालणार नाही, या देशात फक्त संविधानच चालणार आहे, हे जनतेने दाखवून दिले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात जी गद्दारी झाली, ती व्हायला नको होती, असे मत जनतेने व्यक्त केली. जनतेने आशिर्वाद दिले आणि आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आपलाच खासदार विजयी होणार, असे जनता आम्हाला सांगत होती. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. हीच भाजपची पोटदुखी होती. सर्वात बलाढ्य पक्ष म्हणवणार भाजप राज्यात 9 वर आहे. तर आपणही हीच संख्या गाठली आहे. आमच्या महाराष्ट्रात धनशक्ती चालणार नाही, हे जनतेने दाखवले आहे.

आता घटनाबाह्य खोके आणि मिंधे सरकार हचवण्याची जनता वाट बघत आहे. मात्र, मिध्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही. त्यांना निवडणुकीची भीती वाटते, तेच यातून दिसून येत आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेच्या कामांचा बट्टाबोळ झाला आहे. प्रशासकांच्या माध्यमातून सर्व शहरांची लूट सुरू आहे. आपले सरकार आल्यानंतर भ्रष्ट अधिकारी आणि लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुंबई- गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई- अहमदाबाद या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे. मिंधे या रस्ताने गुवाहाटीला पळाले असते तर त्यांनी रस्त्यांची दुर्दशा दिसली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. मिंधे सरकारचे कामात लक्ष नाही. खोके आणि कमीशन घेत राज्याची लूट करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. मिंध्यांना निवडणूकीची भाती वाटत असल्याने राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात येत नाही.

जनतेने भाजप आणि मिंध्यांना नाकारले आहे, त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना पराभव समोर दिसत असल्याने येणारा प्रत्येक दिवस आपला आणि आपल्या लाडक्या कंत्राटदारांचा या धोरणाने ते राज्याची लूट करत आहेत. आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र, बहीणींना पैसे नको, सुरक्षा हवी आहे. महिलांवर अत्याचार करणारे मंत्री आहेत. सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणारे मंत्री आहेत. ते बहिणींना भाऊ वाटतात का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी महिलांना केला.

आता पराभव समोर दिसत असल्याने पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात येईल, असे ते सांगत आहे. मात्र, भूलथापा न देता हिंमत असेल तर वाढीव रक्कम आताच द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. आमचेच सरकार येणार आहे, हे निश्चित आहे. त्यावेळी आम्ही बहिणींना वाढीव रक्कम तर देऊच, त्याचशिवाय सुरक्षाही देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

गरोदर महिलेला 11 तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले. कोणाच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. सरकारमधील जनरल जायर कोण आहे. ही गंभीर घटना घडली त्यावेळी गृहमंत्री दिल्लीत स्वतःसाठी काही मागण्यासाठी गेले होते. तर मुख्यमंत्री शेतावर गेले होते. मिंधे गटाचे वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला तुझा बलात्कार झाला आहे, अशा बातम्या देते आहेस, असे ते म्हणाले. तर किसन कथोर म्हणाले हे आयोजित केलेले आंदोलन आहे. असा निर्लज्जपणा सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे, राज्यातील परिस्थिती आता गंभीर होत आहे.

आता आपली लढाई सुरू झाली आहे. लोकसभेत विजय मिळाला. 400 पारच्या घोषणा देणाऱ्यांना आपण 230 पर्यंत रोखले, हा मोठा विजय आहे. आता महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला खाली खेचायचे आहे. राज्याच्या अस्मितेसोबत, संविधान रक्षणासाठी आपली लढाई सुरू आहे. राज्यातील प्रकल्प हे गुजरातला पाठवत आहेत. राज्यातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, जर्मन शिकण्यासाठी आणि तिथे जाण्यापर्यंतची व्यवस्था कशी करणार, असा सवालही त्यांनी केला.

बेरोजगार तरुणांना जर्मनीत नोकरी देण्याऐवजी जर्मनीतील कंपनीला महाराष्ट्रात बोलवा. येथील तरुणांना रोजगार मिळवून द्या, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले. आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. मात्र, महिलांना वाढीव रक्कम देऊ, तसेच सुरक्षाही देऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.