मुंबईत 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, पोलिसांकडून आरोपीला अटक

बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुंबईतही मोठी घटना घडली आहे. नागपाडा परिसरातील एका 8 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

जुबेर शाह असे त्या आरोपीचे नाव आहे. जुबेर हा एक दागिने विकणारा व्यावसायिक असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली. जुबेर हा दागिने विकण्यासाठी आला होता. यावेळी ती मुलगी हे दागिने आवडीने बघत होती. मुलीला दागिने दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी जुबेरने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, अशी तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.