
कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार प्रकरण आणि बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेला अत्याचार या घटनेने संपूर्ण देशात संताप आहे. आता छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
बिलासपूर रेंजचे आयजी संजीव शुक्ला म्हणाले की, ही घटना सोमवारी संध्याकाळी घडवली आहे. ही आदिवासी महिला गावातील जत्रेत फिरण्यासाठी गेली होती. तिथे आलेल्या लोकांमध्ये पीडित महिला आरोपीला ओळखत होती आणि दोघांनी स्थानिक बाजाराजवळ भेटण्याचे ठरवले होते. ज्यावेळी मुख्य आरोपी तिला भेटला त्यावेळी त्याच्यासोबत अन्य लोकही होते. त्यानंतर आदिवासी महिलेला बळजबरीने तिथल्या तलावाजवळ नेले. तिथे नेऊन सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेच्या माहितीनुसार, तिच्यावर तब्बल आठ लोकांनी बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी महिलेला धमकी दिली आणि तिथून पळाले. अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार आतापर्यंत सहा लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
आयजी संजीव शुक्ला म्हणाले की, मंगळवारी रात्रीपर्यंत याप्रकरणातील 6 आरोपींना अटक केली होती. यातील दोन आरोपी फरार आहेत. रायगढ पोलीस अधीक्षक दिव्याग पटेल म्हणाले की, ते अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून अन्य आरोपींबाबत तपास केला जात आहे. लवकरच अन्य आरोपींना अटक केले जाईल. शुक्ला म्हणाले की, पुसौर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे. शिवाय आरोपींची ओळख जाहीर करू शकत नाही. कारण तपासात अडथळे येतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना गंभीर असून सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.