बदलापूर आंदोलनप्रकरणी 40 जणांना अटक, पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी म्हणत आव्हाडांची टीका

बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्याविरोधात बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते आणि आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 300 आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले असून 40 जणांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांची ही नेत्रदीपक कामगिरी आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलंय की,

बदलापूर पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी वाचा….
बदलापूर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जवळपास तीनशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले
काल मध्यरात्री चाळीस किंवा अधिक लोकांना अटक केली आहे.
सर्वात महत्वाचे हे तेच बदलापूरचे पोलीस आहेत ज्यांनी अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या गर्भवती आईला जवळपास बारा तास पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली सोबत बसवून ठेवले.
हे तेच बदलापुरचे पोलीस आहेत जे सत्ताधारी गटाच्या नेत्याने महिला पत्रकारावर अश्लाघ्य टीका केली तरी तिची F.I.R घेईनात
ती पत्रकार काल चार तास पोलीस स्टेशनला असूनही तक्रार घेतली नाही

पोलिसांनी 40 आंदोलकांना अटक करून आज त्यांना न्यायालयात हजर केले होते. दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. बदलापुरात जमावबंदी लागू करण्यात आली असून सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे.

आरोपीच्या कोठडीत वाढ
दरम्यान आरोपी अक्षय शिंदेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.