बदलापूरच्या घटनेवरून TMC च्या महुआ मोईत्रा यांची महायुती सरकारवर सडकून टीका

कोलकाता नंतर आता बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येत आहेत. ही घटना घडल्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना तब्बल 11 तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे देशभरात संताप उसळला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी देखील या प्रकरणावरून महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली आहे.

महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी केलेल्या कारवाईची तुलना त्यांनी केली आहे. ‘बदलापूर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी अनेक दिवस FIR नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र, कोलकाता पोलिसांनी आरजी कारमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना काही तासांतच अटक केली. हीच तुमची खरी लोकशाही विरोधी आघाडी आहे, अशी सडकून टीका महुआ मोईत्रा यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर केली आहे.