माझं रक्त खवळतंय… बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेवरून मराठी कलाकारांचा संताप

कोलकाता, बदलापूर, नाशिक, पुणे आणि आता अकोल्यामधूनही लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, बदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात एकत्र येत रेल रोको आंदोलन केले. यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या अशा घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता बदलापूर प्रकरणातील दोन चिमुरड्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या पोस्टद्वारे महाराजांच्या काळातील चौरंग न्यायव्यस्थेची आठवण करून दिली आहे. एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलो आहे. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महारांच्या काळातील आरोपींना जशी चौरंग न्यायपद्धती होती, तशाच पद्धतीचे अनुकरण आपल्या देशात व्हायला पाहिजे, अशी भावना रितेश देशमुखने व्यक्त केली आहे.

अभिनेत्री प्रिया बापट, अभिनेता प्रसाद ओक यांनीही बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. ‘बदलापूर येथील आदर्श शाळा विद्या मंदिर या शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार करण्यात आला. शौचालय आणि स्वच्छतागृहे साफ करणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्याने हे कृत्य केले. तो बलात्कारी बदलापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत, आणि दोन्ही 4 वर्षांच्या निष्पाप मुली रुग्णालयात दाखल आहेत. ही बातमी ऐकून माझं रक्त खवळतंय. हे कोणत्याही प्रोफेशनबद्दलचे नसून हे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल आहे. आम्हाला न्याय हवाय…’ अशी पोस्ट प्रिया बापटने शेअर केली आहे.

‘ठरलं तर मगं’ या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने देखील बदलापूर प्रकरणावर रोष व्यक्त केला. ‘कोलकाता, बिहार, दिल्ली, बदलापूर वगैरे… या प्रकरणातील आरोपींना थेट पब्लिक धुलाईला द्या.. कसले पुरावे हवेत अजून कसली वाट बघतोय आपण… किळस येतोय अक्षरश: संताप होतोय… फक्त मेणबत्या लावून काही होणार नाही… या नराधमांनी जे केलं त्याच वेदना त्यांनाही द्या…, असा राग जुईने आपल्या पोस्टमधून व्यक्त केला.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील पुरे झालं आता… ही वेळ बदला घेण्याची आहे…, असे तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.

जे कृत्य अमानवी आहे त्याला शिक्षा तरी मानवी का असावी? असा प्रश्न अभिनेता अभिजीत केळकरने उपस्थित केला आहे.

अभिनेत्री सुरभी भावेनेही बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘वय नाही, जात नाही, धर्म नाही फक्त स्त्री आहे ना तो अवयव आहे ना मग, भोगा तिला, ओरबाडून काढा हा 5 ते 7 इंची माज ठेचायची वेळ आली आहे …. बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार… एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग !!! माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित… त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाहीये… कधी अशा आरोपींना डायरेक्ट मृत्युची शिक्षा होईल या देशात देव जाणे… असे म्हणत अभिनेत्री सुरभीने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.