
कोणतेही राजकारण न करता आरोपीला कठोर शिक्षा द्या!
बदलापूरमध्ये दोन चिमुरडय़ा मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. मिंधे सरकार लाडकी बहीण योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोटय़ा छोटय़ा मुलीही महाराष्ट्रात असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतील गुन्हेगारांविरुद्ध फास्ट ट्रक न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बदलापूरमधील घटनेबाबत भाष्य केले.
शिक्षा देण्यास दिरंगाई करणाऱ्यांनाही जबाबदार धरा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्लीतील ‘निर्भया’ घटनेचाही दाखला दिला. ‘निर्भया’चे आरोपी पकडले गेले, गुन्हे शाबीत झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिली गेली? या सर्व दिरंगाईला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल त्यांनी केला. एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार जितके जबाबदार असतात तसेच त्या घटनेचा न्यायनिवाडा करून त्यांना शिक्षा देण्यात दिरंगाई करणाऱ्यांनाही जबाबदार धरायला हवे. असे झाले तरच अशा घटनांना आळा बसू शकेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अत्याचार कुठेही घडो, आरोपी सुटता कामा नयेत
उन्नाव असो, हाथरस असो, राजस्थानमधील घटना असो वा आता बदलापुरात जे घडले ते असो. कुठेही अशा स्वरूपाची अत्याचाराची घटना घडली तरी आरोपी सुटता कामा नयेत. सर्वजण पक्षभेद, जातभेद बाजूला ठेवून अशा घटनांमध्ये एकत्र झाले तरच आपल्या राज्यातील महिला सुरक्षित राहू शकतील, असे सांगतानाच, माझ्या राज्यातील बहीण ही माझी लाडकी बहीण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गुन्हेगार भाजपाचा असो वा कुणाचा, तातडीने कारवाई करा
आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे दावे काही पालकांनी केले आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, बदलापूरमधील ती शाळाच भाजपावाल्यांची असल्याचे मला समजले आहे. पण इथे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता आरोपीवर तातडीने कारवाई केली पाहिजे. आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असो वा अन्य कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘शक्ती’ विधेयकाची शक्ती या गुन्हेगारांना दाखवून द्या
महाविकास आघाडी सरकारच्या ‘शक्ती’ विधेयकाचा मुद्दाही यावेळी माध्यमांनी उपस्थित केला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकार ‘शक्ती’ कायदा आणणार होते. त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र तेव्हा कोरोनाचा काळ होता. त्यामुळे केवळ दोन ते तीन दिवस अधिवेशन घेता येत होते. अधिवेशनात त्यावेळी ‘शक्ती’ विधेयक मांडता आले नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर आमचे सरकार ‘शक्ती’ कायदा पारित करणार होते, मात्र काही लोकांनी गद्दारी करून आमचे सरकार पाडले. आता त्या गद्दारांनी सरकार स्थापन केले आहे, मात्र ‘शक्ती’ विधेयक प्रलंबित ठेवले आहे. त्या ‘शक्ती’ विधेयकाची शक्ती गुन्हेगारांना दाखवून द्या, तरच आपण आपल्या बहिणींना लाडक्या बहिणी बोलू शकतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारला लगावला.
आरोपी भाजपाचा कार्यकर्ता आहे म्हणून निबंध लिहून सोडणार का?
बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे. अशा घटना देशात वारंवार घडत आहेत. ठरावीक राज्यांमधील ठरावीक घटनांचे राजकारण केले जाते, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी वरळीत हिट अॅण्ड रन प्रकरण घडले होते. त्या घटनेतील आरोपी मिहीर शहाने त्या महिलेला फरपटत नेले होते. तो भाजप नेत्याचा मुलगा असल्याने त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सोडून दिले होते. बदलापूरमधील घटना घडलेल्या शाळेचा विश्वस्तही भाजपाशी संबंधित आहे आणि आरोपीही भाजपाचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून घेऊन त्याला सोडून देणार का, असा सवाल करतानाच, आरोपीवर विनाविलंब कारवाई झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशा नराधमांवर जरब बसला पाहिजे तरच आणि तरच आपल्या बहिणीला आपण लाडकी बहीण म्हणू शकू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.