हिंदुस्थानचे वर्चस्व मोडून काढू!

हिंदुस्थानविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सर्वस्व पणाला लावणार आहे. मात्र हिंदुस्थानचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वस्व पणाला लावावे लागेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. स्मिथच्या आधी सध्याचा संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, फिरकीपटू नॅथन लायन आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांनीदेखील मालिकेबाबत वक्तव्ये केली आहेत. 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थानला कसोटी मालिकेत पराभूत करेल, असा विश्वास सगळ्यांना आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये हिंदुस्थानला शेवटच्या कसोटी मालिकेत पराभूत केले होते.

टीम इंडियात स्टार्सची कमतरता नाही!

स्मिथ पुढे म्हणाला, ‘विजय सोपा होईल असे मी अजिबात म्हणत नाही. टीम इंडिया एक मजबूत संघ आहे आणि त्यांच्याकडे सुपरस्टार्सची कमतरता नाही. पण आता कसोटी मालिकेत हिंदुस्थानला पराभूत करण्याची भूक माझ्यात निर्माण झाली आहे. यावेळी फक्त ऑस्ट्रेलिया जिंकेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा इशाराही स्मिथने दिला आहे.

दहा वर्षांची प्रतीक्षा

ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये हिंदुस्थानचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीवर कब्जा केला होता, मात्र कांगारू संघ 2014-15 पासून कोणत्याही कसोटी मालिकेत हिंदुस्थानला पराभूत करू शकला नाही. 2014 मध्ये स्मिथच्या नेतृत्वाखाली संघाने 2-1 ने मालिका जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत चार मालिका झाल्या असून त्या चारही हिंदुस्थानने 2-1 अशा फरकाने जिंकल्या आहेत. त्यामुळे दहा वर्षांपासूनची ही पराभवाची मालिका खंडित करण्याची ऑस्ट्रेलियाला लागली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान दोन सर्वोत्तम संघ

स्मिथ म्हणाला, ‘हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे या क्षणी दोन सर्वोत्तम संघ आहेत, म्हणूनच या दोघांमध्ये 2023 ची डब्ल्यूटीसी फायनलदेखील झाली. आम्ही डब्ल्यूटीसी जिंकलो, परंतु अद्याप हिंदुस्थानविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकणे बाकी आहे. हिंदुस्थानने गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे. पण मला आशा आहे की, यावेळी ऑस्ट्रेलिया टेबल फिरवेल आणि मालिका जिंकेल. हिंदुस्थानविरुद्धच्या शेवटच्या मालिका विजयाला दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे यावेळी आम्हाला जिंकावे लागेल.’