पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलीस पाथर्डीत; कागदपत्रे घेतली ताब्यात

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संदर्भातील कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी येथील तहसील कार्यालयात दिल्ली पोलिसांचे दोन जणांचे पथक आले होते. या पथकाने स्थानिक प्रशासनाकडून पूजा खेडकर यांच्या आई आणि भालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवताना जे नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत दाखल केले होते ते नामनिर्देशन पत्र पथकाने आपल्या ताब्यात घेतले आहे.

हे पथक खेडकर कुटुंबाचे गाव असलेल्या भालगाव येथे सुद्धा जाईल, असे वाटत होते. मात्र, भालगावला न जात या पथकाने तहसील कार्यालयातच डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्याची माहिती घेतली. डॉ. खेडकर यांनी मागील वेळेस झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर त्या नंतर झालेल्या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या आणि बहुमताने निवडून आल्या होत्या. मात्र त्या नंतर पुन्हा एकदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या निवडणुकीत डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते व त्याच्या सोबत जी कागदपत्रे निवडणूक शाखेत दाखल केली होती त्या सर्व कागदपत्रांची दिल्लीच्या पथकाने छाननी करत या कागदपत्रांच्या प्रति आपल्या सोबत नेल्या. या संदर्भात या पथका कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.