बाहुबलीतील अक्राळविक्राळ कालकेय प्रभाकर करणार मराठीत पदार्पण

‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले. त्याने साकारलेल्या ‘कालकेय’ च्या भूमिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर याने सिद्ध केलं की तो कोणत्याही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकतो. हाच ‘कालकेय’ म्हणजे अभिनेता प्रभाकर आता मराठीत दिसणार आहे. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट 30 ऑगस्टला 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात इमोशन्स, सूडनाट्य, आणि ड्रामा असलेला ‘अहो विक्रमार्का’ जबरदस्त अॅक्शनपट असणार आहे.

आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसादवर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे.‘अहो विक्रमार्का’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.