तेलंगणातील बीआरएस पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा त्यांच्या राज्यात पराभव झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात फारसे स्वारस्य न दाखविल्याने राज्यभरातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. आता एमआरएस अर्थात महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना केल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत करुन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून येणार्या विधानसभा निवडणूका लढविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बीआरएस पक्षाची राज्यस्तरावरील बैठक मंगळवारी नांदेडच्या विश्रामगृहात पार पडली. यात राज्यभरातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील दिडशेहून अधिक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार मनोहर पटवारी, नाशिकचे शंकर भाऊ घोडके, नाना गाडबैले आदी उपस्थित होते.
शंकर धोंडगे म्हणाले की, बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात प्रचार व प्रसार करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. 26 मार्च 2023 रोजी लोह्यात मेळावा घेतल्यानंतर राज्यभरात काटोल पासून गडहिंग्लज पर्यंत सर्व भागात फिरुन 15 ते 20 लाखाची सदस्य नोंदणी केली. राज्याला ज्याची दखलही घ्यावी लागली. मात्र त्यानंतर तेलंगणामध्ये विधानसभेत बीआरएस पक्षाचा पराभव झाल्याने त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणूकासंदर्भात फारसे स्वारस्य दाखवले नाही. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांनी उमेदवार उभे करण्यास महाराष्ट्रात नकार दिला. त्यामुळे राज्यभरातील पदाधिकार्यांच्या पुणे आणि आज नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर सर्वानुमते महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य समिती या नावाचा पक्ष आम्ही स्थापन करत असून, पदाधिकार्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या पक्षाची घटना, जाहीरनामा व अधिकृत नोंदणीसाठी आम्ही लवकरच अर्ज करणार आहोत, तसेच समविचारी पक्षाला सोबत घेवून महाराष्ट्रातील 60 ते 65 विधानसभेच्या जागा आम्ही लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशीही आमची तीनवेळा चर्चा झाली असून, त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही याबद्दल अनुकूलता दर्शवून परिवर्तन आघाडीत सामील होण्याची संमती दिली आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमची हि परिवर्तन आघाडी महाराष्ट्रात निश्तिच ताकद दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या 5 सप्टेंबर रोजी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, परिवर्तन आघाडीत समाविष्ट असलेल्या सर्व मान्यवरांना यात निमंत्रित करण्यात आले आहे. अनेक लोक व अनेक छोटे पक्ष आमच्यासोबत जोडण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याची ताकद येत्या 5 सप्टेंबरला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.