बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांसारखंच वागवलं पाहिजे, आदित्य ठाकरे यांचा संताप

बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर शिवसेना नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ”बलात्कार करणाऱ्या नराधमांना दहशतवाद्यांसारखेच वागवले पाहिजे. या घटनांमध्ये आता इतकी कठोर शिक्षा व्हायला हवी की ते बघून बलात्काऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली पाहिजे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक उद्विग्न पोस्ट शेअर केली आहे. ”महिलांसाठी स्वसंरक्षणाचे क्लासेस सुरू करावे असे दररोज वाटते, पण माझं मन मला विचारतं… असं का? आणि जरी काळाची गरज म्हणून आपण लवकरच क्लासेस सुरू केले तरी का हा एक प्रश्न तसाच राहतो… महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांवरच का? का समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊ शकत नाही?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून केला आहे.

तसेच याच पोस्टमधून त्यांनी बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. ”दररोज देशभरात होणाऱ्या बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत ऐकतो व तेव्हा संताप होतो. जे दोषी आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. बलात्कार हा मानवतेविरोधातील एक गंभीर गुन्हा आहे. आजची बदलापूरची घटना अत्यंत त्रासदायक आहे. बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात वयात कोणताही भेद नसतो. आम्हाला न्याय हवा आहे. एका कडक कठोर शिक्षेचे असे उदाहरण आम्हाला हवे आहे की ज्याने अशा बलात्काऱ्यांच्या मनात भिती निर्माण होईल’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच महाराष्ट्राच्या शक्ती बिलाला राष्ट्रपतीस द्रौपदी मुर्मू यांनी लवकरात लवकर मंजूरी द्यावी असही त्यांनी या पोस्टमधून म्हटले आहे. ”महाराष्ट्रासाठी मी राष्ट्रपती मुर्मू यांनी बऱ्याच काळापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या शक्ती बिल मंजूर करावे त्यामुळे महिलांविरोधातील गुन्ह्यांतील कायदे अधिक मजबूत होतील. मी याआधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय की बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांसारखेच वागवले पाहिजे”, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.