
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. अशा नराधमांना सार्वजनिकरित्या फाशी दिली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच 200 कोटी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च करून सरकार लाडकी बहीण योजनेचा बोलबाला करत आहेत. तर तुमच्या लेकीबाळींची सुरक्षा महत्त्वाची नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, फास्टट्रॅक कोर्टात असे खटले चालवून सार्वजनिक ठिकाणी अशा नराधमांना फाशी दिली पाहिजे. जेणेकरून कुणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही. राज्यात महिलांविरोधातील गुन्हे वाढतच आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीतूनच हे स्पष्ट होत आहे. मला कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाहिये. पण 200 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करून लाडकी बहीण, लाडकी बहीण करत फिरत आहेत. तुमच्या लेकींची सुरक्षितता महत्त्वाची नाहिये का? असा सवाल सुळे यांनी विचारला
हा संवेदनशील विषय आहे. पीडितेची कुठलीही ओळख उघड होता कामा नये, कारण त्या मुलींपुढे संपूर्ण आयुष्य आहे. या मुलींचं समुपदेशन केलं पाहिजे. देशात सर्वाधिक मुली आपल्या राज्यातून बेपत्ता होत आहेत. हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे. जे कोणी सत्तेत आहेत त्यांनी संवेदनशीलपणे कृती केली पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.