Sanjay Raut News – महायुतीच्या जागावाटपावर संजय राऊत यांचे मोठे विधान, व्यक्त केली ही भिती

महायुती हे गोंडस नाव आहे, पण तिनही पक्षात मतभेद आणि संघर्ष सुरू आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महायुतीच्या जागावाटपात रक्तपात होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

नागपुरात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जायचा रस्ता आहे असं वाटतंय. संपूर्ण मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये हीच अवस्था आहे. कारण कंत्राटदारांकडून फक्त पैसे आणि कमिशन घेतले जात आहे. राज्यातलं हे सरकार असंवैधानिक आहे असेही संजय राऊत म्हणाले.

तिकिटवाटपावेळी रक्तपात

महायुतीच्या तिकिटवाटपावर संजय राऊत म्हणाले की, मला भिती आहे की महायुतीत तिकिटवाटपावर चर्चा होईल तेव्हा रक्तपात होईल अशी चर्चा मी ऐकतोय. अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं मी ऐकलंय. आणि ही शिंदे गटाची भुमिका आहे. कारण त्यांच्या वाटेला कमी जागा येतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तीन पक्षात एकवाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे. ही युती नाही, दररोज त्यांच्या मारामारी आणि संघर्ष सुरू आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची, थोबाड फोडण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेले आहे हे आपण पाहू शकतो. मुंबई, कोकण, नाशिकमधले रस्ते एकदा पाहा म्हणजे लक्षात येईल की कंत्राटदाराची कशी लूट सुरू आहे हे लक्षात येईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास खातं या शिंदे गटाच्या एटीएम मशीन बनल्या आहेत. त्यामुळे कामं होत नाहीत. सरकार हे फक्त पैश्यांसाठी काम करत आहे. अनेक लोकं खड्ड्यात पडून मरण पावली आहेत. ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले त्या रस्त्याच्या बाबतीत तर सत्य तर आहेच. पण प्रकरण मारामारीपर्यंत गेले असून जागावाटप करतानाही त्यांच्यात मारामारी होणार आहे. उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागावाटपासाठी तेव्हा त्यांच्यात मारामाऱ्या होतील, एकमेकांच्या जागा पाडल्या जातील. जागावाटपावेळी रक्तपात होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे असेही संजय राऊत म्हणाले.