कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी संजय रॉय या नराधमाला अटक केली आहे. संजय रॉय बाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.
संजय रॉय याची चार लग्न झालेली असून त्यातील तिघी त्याला सोडून पळून गेल्या तर एकीचा मृत्यू झाला आहे. संजयच्या हिंसक वृत्तीमुळे त्याच्या पत्नी त्याला सोडून गेल्याचे देखील समोर आले होते. दरम्यान संजय रॉयच्या एका सासूने तो विकृत असल्याचे म्हटले आहे. ”आरोपी संजय रॉय ( Sanjoy Roy ) हा विकृत मनोवृत्तीचा माणूस होता आणि तो माझ्या मुलीला रोज मारहाण करायचा”, अशी माहिती त्याच्या सासूने दिलेली आहे.
”संजय रॉय आणि माझ्या मुलीचं लग्न दोन वर्ष टिकलं. तो तिला दररोज मारहाण करायचा. माझी मुलगी तीन महिन्यांची गरोदर असताना देखील त्याने तिला मारहाण केली होती. त्यानंतर तिचा गर्भपात झाला होता. या प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केलेली”, असं संजय रॉय सासूने सांगितले. दरम्यान संजयला फाशी द्या किंवा त्याच्यासोबत काहीही करा आम्हाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. पण त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे देखील त्याच्या सासूने सांगितले आहे.
आधी दारु पित पॉर्न पाहिला, मग रुग्णालयात घुसून
9 ऑगस्टला रात्री 11 वाजता आरोपी संजय रॉयने रुग्णालयाच्या मागच्या बाजूस बसून दारु पित पॉर्न फिल्म पाहिली. त्यानंतर रुग्णालयाच्या मागच्या दरवाजाने पहाटे 4 वाजता त्याने आत प्रवेश केला. यावेळी जवळपास 5-6 लोक त्या दरवाजातून आत येताना सीसीटीव्हीत दिसून आले. अन्य सर्व लोकांची चौकशी केली असता ते रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी संजयकडे रुग्णालयात येण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते. संजय 4 वाजता रुग्णालयात घुसला. त्यानंतर चौथ्या मजल्यावरील सेमिनार रुममध्ये घुसून डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि मग हत्या केली. त्यानंतर 4.45 वाजता तो रुग्णालयातून बाहेर पडला आणि रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बॅरेकमध्ये जाऊन झोपला. पोलिसांनी याच बॅरेकमधून त्याला अटक केली. अटकेच्या वेळीही तो नशेत होता.