उत्तर प्रदेश येथून मुंबईत येऊन घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शादाब हुसेन, अमीर सोहिल, सलमान नदाफ, एजाज अन्सारी, शकील अन्वर अशी त्यांची नावे आहेत. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. गेल्या आठवडय़ात त्यांच्या घरी घरफोडी झाली होती. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक राजेश नंदिमठ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मनोज चाळके, उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे, धीरज वायकोस, पेडणेकर, महाले, सांगळे, पह्पसे, शिंगटे, पुजारी आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये पोलिसांना एक जण रिक्षातून त्या इमारतीमध्ये जाताना दिसला. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मेहुण्याची चौकशी केली. त्याचे काही मित्र उत्तर प्रदेश येथून मुंबईत आले. त्याची एक गाडी असून त्याने भेटण्यासाठी मीरा रोड येथे बोलवल्याचे सांगितले.
पोलिसांनी मीरा रोड परिसरात फिल्डिंग लावली. चोरटे हे मनोर येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. जव्हार मोखाडाहून नाशिकला जाणाऱ्या मार्गाने पोलिसांनी एक गाडी थांबवून पाच जणांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, नेकलेस, बांगडय़ा, अंगठी, घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. या टोळीने काही दिवसांपूर्वी घाटकोपर परिसरात घरफोडी केली होती. त्या पाच जणांच्या अटकेने तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एजाजविरोधात अहमदाबाद येथे 12, अमीरविरोधात अहमदाबाद येथे चार गुन्हे दाखल आहेत. ही टोळी मुंबई, अहमदाबाद येथे घरफोड्या केल्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे जात असायचे.
दिवसा करायचे रेकी
ही टोळी घरफोड्यांसाठी मुंबईत यायचे. दिवसभर ते रेकी करायचे. रेकीनंतर बंद असलेल्या फ्लॅटला टार्गेट करून ते घरफोडी करायचे. मुंबईत घरफोड्या केल्यानंतर ते दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जायचे. वातावरण शांत झाल्यावर ते पुन्हा चोऱ्या करण्यासाठी मुंबईत यायचे.