दहावीचा अभ्यास करायचा आहे. शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यामुळे गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका एका बलात्कार पीडितेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ही पीडिता मुंबईत राहते. तिचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. बहीण अपंग आहे. एकाने तिच्यावर जबरदस्ती केली. एका रात्री अचानक तिच्या पोटात दुखू लागले. तेंव्हा तिची चाचणी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिच्या आईवडिलांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. पीडितेवर जबरदस्ती करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
जे.जे. रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत. पीडितेने गर्भपातास परवानगी मागितली. गर्भ 26 आठवड्यांचा झाल्याने डॉक्टरांनी यास नकार दिला. पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतली. गर्भामुळे मला मानसिक व शारीरीक त्रास होत आहे. मी दहावीला असून अभ्यासावर परिणाम होत आहे. बाळाची काळजी घेता येणार नाही. त्यामुळे गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.