दोन पक्ष फोडून महाराष्ट्रातील सत्ता मिळवणाऱ्या भाजपची गोची झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत दादागिरी आणि भाईगिरीचा भडका उडाला असून भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार राडे सुरू झाले आहेत. भाजपने रविवारी जुन्नरमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवत टार्गेट केले, तर आज मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचा वाद इतका पेटला की, एकमेकांना थोबडवण्याची उघड धमकी मिंधे गटाचा नेता आणि भाजपच्या मंत्र्याने दिली. भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत असल्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. त्याचवेळी मिंधे गट आणि अजित पवार गटातही धुसफुस वाढली असून महायुतीतील वर्चस्वाची ही लढाई येत्या काळात आणखी भडकणार आहे.
रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री… राजीनामा द्या!
प्रत्येक वेळी चव्हाण या महामार्गाच्या पाहणीचे नाटक करतात, ते शायनिंगगिरी करत फक्त रस्त्यांची पाहणी करण्याची नौटंकी करत आहेत. शायनिंग मारण्यापेक्षा कामे करा.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून फक्त चमकेशगिरी आणि शायनिंग मारण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे पाहणी दौरे करत असल्याचा आरोप मिंधे गटाचे रामदास कदम यांनी केला. या चमकेशगिरी करणाऱ्या रवींद्र चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. गणेशोत्सव जवळ आला तरीही महामार्गाची अवस्था भीषणच आहे. याबाबत कदम यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्ला केला.
कदम, सांभाळून बोला, नाहीतर थोबाड फोडेन
मला लक्ष्य करण्याचा रामदास कदम प्रयत्न करत असतील तर जशास तसे उत्तर मिळेल. तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे थोबाड फोडेन. तुम्हाला वाचवायलाही कोणी येणार नाही.
मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण चांगलेच खवळले. गेली चाळीस वर्षे रामदास कदम आमदार होते. त्यांनी कोकणच्या विकासाचे कोणते दिवे लावले. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. मीही जशास तसे उत्तर देऊ शकतो लक्षात ठेवा, असे रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना सुनावले. रामदास कदम हा अडाणी माणूस असल्याची तोफही रवींद्र चव्हाण यांनी डागली.
आम्हालाही पन्नास गोष्टी बोलता येतात!
युतीधर्म दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. आम्हीही माणसं आहोत. आम्हालाही मन आहे याचे भान असू द्या. तुमच्याबद्दल पन्नास गोष्टी आम्हालाही बोलता येतील. तेव्हा पथ्य पाळा.
अशाप्रकारचे आरोप करणे कुठल्या युतीधर्मात बसते? रामदास कदम यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते अंतर्गत बैठकीत मांडले पाहिजे. प्रत्येकवेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असा पवित्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. कदम यांच्या आरोपावर पन्नास गोष्टी आम्हालाही बोलता येतील. तेव्हा त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे ही अपेक्षा आहे, असा इशारा फडणवीसांनी दिला. आम्हीही माणसे आहोत, आमचीही मने दुखावतात याचे भान ठेवा, असे फडणवीस म्हणाले.
भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत!
मिंधे गटाकडून थेट भाजपच्या मंत्र्याला लक्ष्य करण्यात आल्याने भाजप खवळला असून युतीधर्म पाळा अन्यथा अरेला कारे आम्हालाही करता येते, असा इशारा भाजपकडून देण्यात आला. भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकटय़ा भाजपला नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, असा इशारा आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला.
दादागिरी आणि भाईगिरी
तिन्ही पक्षांत दादागिरी आणि भाईगिरीचा भडका उडाला आहे. अजित पवार घटक पक्षांना डावलतात. श्रेयासाठी चोरून बैठका घेतात म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुन्नरमध्ये अजितदादांना रविवारी काळे झेंडे दाखवले. मिंधे गटाने मंचरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकला. तर रायगडमध्येही कर्जतमध्ये कोण लढणार यावरून अजित पवार गट आणि मिंधे गटात वादाची ठिणगी पडली आहे. सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचे थोरवे म्हणाले, तर थोरवेला मी मोजत नाही, असे प्रत्युत्तर तटकरेंनी दिले.
पालघरमध्ये भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत रामदास कदम यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या आणि कदम यांचा पुतळा जाळला.