देवेंद्र फडणवीस आता राजीनामा देण्याची भाषा करत आहेत. हा पश्चाताप करून घेण्याची वेळ का आली याचा विचार करा. तुम्ही मराठ्यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार, असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
मी मराठा आरक्षणात कुठलाही खोडा घातला नाही. यासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावे, नसता मी राजीनामा देतो असे फडणवीस म्हणाले आहेत. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी टीकेचा भडीमार केला. राजीनामा देण्याची भाषा फडणवीस करत आहेत. हा पश्चाताप करून घेण्याची वेळ का आली याचा शोध त्यांनी घेतला पाहिजे. पुढचा पश्चाताप टाळायचा असेल तर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागण्यांचा पुनरुच्चारही मनोज जरांगे यांनी केला.
आम्हाला राजकारणात उतरायला मजबूर करू नका
मी मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करत असल्यानेच माझ्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली. आंतरवालीत लाठीहल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या. आम्हाला राजकारणात उतरण्यासाठी मजबूर करू नका, आम्ही राजकारणात आलो तर तुमचे हाल होतील, असे जरांगे म्हणाले.