बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; टेंभुर्णीत दोघांना अटक

बाजारामध्ये बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या दोन संशयित आरोपींना टेंभुर्णी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 48 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील पंढरपूर चौकातील उड्डाणपुलाखाली ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मीकांत शंकरआप्पा अळगी (वय 32, रा. अक्कलकोट), सागर मच्छिंद्र बारवकर (वय 34, रा. देऊळगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

टेंभुर्णी बाजारपेठेत बनावट नोटा खपविण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती. या आधारे रविवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, विलास रणदिवे, हवालदार संदीप गिरमकर, विनोद साठे, प्रवीण साठे यांच्या पथकाने सापळा रचला.

सोलापूर-पुणे रस्त्यावरील पंढरपूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ नेक्सान गाडीतून आलेल्या लक्ष्मीकांत अळगी व सागर बारवकर यांना पोलिसांनी रोखले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, 5 एमए सीरिज असलेल्या 100 रुपयांच्या एकूण 464 व 9 बीए सीरिजच्या 100 रुपयांच्या 20 नोटा अशा एकूण 484 बनावट नोटा आढळून आल्या. दोघांकडे याबाबत माहिती विचारली असता, या नोटा बाजारपेठेत वापरण्यासाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली. टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे तपास करीत आहेत.