सांगलीतील महिला डॉक्टरची 15 लाख रुपयांची फसवणूक, अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल

तुमच्या बँक खात्यावरून मनी लॉण्डरिंगचे व्यवहार झाल्याची भीती घालून याबाबत मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून डॉक्टर महिलेला तीन संशयितांनी तब्बल 15 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डॉ. शीतल संजय पाटील (रा. गावभाग, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. पाटील या गावभागातील मारुती चौक परिसरात राहतात. 7 ऑगस्ट रोजी संशयित सुरेशकुमार दास याने डॉ. पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. तुमच्या नंबरवर 17 मेसेजेस इनलिगल आहेत. या खात्याबाबत मनी लॉण्डरिंग, गॅमलिंगच्या तक्रारी आल्या असून, टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी करत आहेत. या प्रकरणाशी तुमचा संबंध नाही, हे सिद्ध करायचे असेल तर पैसे पाठवावे लागतील, असे सांगितले.

दुसरा संशयित हेमराज कोळी याने फिर्यादी महिलेला व्हॉट्सऍपवरून व्हिडीओ कॉल करून पोलीस अधिकाऱ्याचे ओळखपत्र दाखवले. सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट, ईडीची, आरबीआयची नोटीस व्हॉट्सऍपवर टाकली. अधून-मधून आपण विश्वास नांगरे-पाटील बोलत असल्याचे सांगून एकजण डॉ. पाटील यांना भीती घालत होता. असे करून त्या तिघा संशयितांनी डॉ. पाटील यांच्याकडून ऑनलाइनच्या माध्यमातून 15 लाख 50 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, डॉ. पाटील यांनी शहर पोलिसांत धाव घेऊन तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.