
पत्रकार परिषद सुरु असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काँग्रेस नेत्याचे निधन झाल्याची घटना बंगळुरुत घडली. बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांचे प्रेस क्लबमध्ये चालू पत्रकार परिषेदत मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. याबाबत ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतानाच काँग्रेस नेते रवींद्र अचानक खुर्चीवरून खाली पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रवींद्र खुर्चीवर बसून माईकवर पत्रकारांना संबोधित करत आहेत. बोलता बोलता त्यांच्या हातातून कागद निसटून खाली पडला. आधी लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. काही सेकंदानंतर माईक, खुर्चीसह ते खाली पडले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.