रिटेल सेक्टरमध्ये वर्षभरात 52 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पदव्या हातात असूनही नोकरी मिळवणे अवघड होऊन बसले आहे, तर ज्यांना नोकऱ्या लागल्या आहेत, त्यांच्या नोकऱ्या राहतील की नाही, याची काहीही गॅरंटी राहिलेली नाही. हिंदुस्थानात वर्षभरात तब्बल 52 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात एकट्या रिटेल सेक्टरमधून 52 हजार जणांना नोकरी गमवावी लागली आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स रिटेल, टाटा समूहाची टायटन, रेमंड, पेज इंडस्ट्रीज, स्पेन्सर यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

टायटनमध्ये कर्मचारी कपात

गेल्या आर्थिक वर्षात टायटन कर्मचाऱ्यांच्या संख्येत 8,569 कमी आली आहे. हा आकडा 17,535 वर आला आहे, तर पेज इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 31 मार्च 2024 मध्ये 22,564 वर आली आहे. यात एका वर्षात 4,217 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. रिलायन्स रिटेल, टायटन, पेज, रेमंड आणि स्पेन्सरमधील एपूण 52 हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.

एकट्या रिलायन्स रिटेलमधून 38 हजारांना डच्चू

रिटेल सेक्टरमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कमी होऊन 2,07,552 वर आली आहे, जी एकूण कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास 60 टक्के आहे. वर्षभरापूर्वी रिटेल सेक्टरमध्ये 2,45,581 कर्मचारी काम करत होते. म्हणजेच एकट्या रिलायन्स रिटेलमधून जवळपास 38 हजार लोकांनी नोकरी गमावली आहे. रिलायन्स जिओमध्येही कर्मचारी कपात करण्यात आली असून रिलायन्समधील एकूण कर्मचारी कपात ही 42 हजारांवर पोहोचली आहे.