
रक्षाबंधनाच्या सणाला गालबोट लावणारी घटना सिंधुदुर्गातील आचरा येथे घडली आहे. सोमवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आचरा येथे घडली. तर सुदैवाने एकाचा जीव वाचला आहे. ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, लक्ष्मण शिवाजी सुर्वे आणि प्रसाद भरत सुर्वे अशी मयतांची नावे आहेत. वायंगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत हे पोहत किनाऱ्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावले आहेत. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात धुरत यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील जनता जनार्दन मच्छिमार नौका रविवारी मध्यरात्री आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, लक्ष्मण शिवाजी सुर्वे, प्रसाद भरत सुर्वे आणि विजय अनंत धुरत असे चौघेजण आचऱ्यातून देवगडच्या दिशेने बोटीने मासेमारीसाठी गेले होते.
कुणकेश्वर ते गजबादेवी मिठबाव दरम्यान समुद्रात मासेमारीसाठी त्यांनी जाळी टाकली. जाळी टाकून झाल्यानंतर 2 वाजता ते परतीच्या मार्गाला लागले. मात्र समुद्रात दाट धुके पसरल्याने त्यांना परतीचा मार्ग निश्चित करण्यास अडथळे येत होते. आचरा समुद्रादरम्यान येताच अचानक बोटीमध्ये पाणी भरू लागले आणि काही क्षणातच त्यांची बोट बुडाली.
महिनाभरापूर्वी मुलगा अपघाती गेला, आज बाप बुडाला
मृतांपैकी लक्ष्मण सुर्वे यांच्या मुलाचे गेल्या महिन्यात अपघाती निधन झाले होते. मुलाचे दुःख उराशी बाळगून लक्ष्मण सुर्वे कुटुंबासाठी पुन्हा उभे राहिले. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. रविवारी मासेमारीसाठी गेले ते परतलेच नाही. आधी मुलगा मग पती गेल्याने त्यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मण यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहे.