देवगडमध्ये नारळी पोर्णिमा उत्साहात साजरी; सागराला नारळ अर्पण

देवगडमधील देवगड बंदर येथे शासकीय नारळी पौर्णिमा उत्सव नारळ पूजनाने साजरा करण्यात आला. नारळाची विधीवत पूजा करत सागराला नारळ अर्पण करण्यात आला. या सणापासून कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. सागराला नारळ अर्पण करत खवळलेला समुद्र शांत होण्याची आणि मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी समुद्राला साकडे घालण्यात येते.

या पूजेवेळी उद्योगपती नंदकुमार घाटे,महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, नायब तहसीलदार मोरे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. देवगड बंदरासह पवनचक्की बीच,मळई, तारामुंबरी, मिठमुंबरी, कुणकेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवरही सागराला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.