“मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे.” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस यांनीच सांगितल्याचे महाधिवक्त्ते आशितोष कुंभकोणी यांनीही जाहीरपणे सांगितले होते, फडणवीसांचे निकटवर्तीय गुणरत्न सदावर्ते हे ही आरक्षणाविरोधात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षणप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे बोलले ते साफ खोटे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न चिघळवत ठेवून सत्ता भोगायची या ब्रिटिशांच्या ‘फोडा व राज्य करा’ नितीने भाजप काम करत आहे. फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला होता, त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले आहेत. फडणवीस सरकार असतानाच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठरावही पास करण्यात आला होता, पण नंतर ते कोर्टात टिकू शकले नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. हे विरोधी पक्षांनी स्पष्ट केलेले असतानाही शिंदे सरकार विरोधकांवरच आरोप करत आहे हे चुकीचे आहे.
लाडकी बहीण योजना ही सरकारला निवडणुकीच्या तोंडावर आठवलेली आहे. दोन वर्ष त्यांना बहीण आठवली नाही, फक्त उद्योगपती व कंत्राटदार आठवत होते. पण लोकसभेला जनतेने धक्का दिल्याने त्यांना बहीण आठवली. मतं दिली नाहीत तर योजनेचे पैसे परत घेऊ अशा धमक्या देत आहेत. सत्तेततील हे लोक सावत्र व कपटी भाऊ आहेत. त्यांच्यापासून भगिनींनी सावध रहावे असे आवाहन पटोले यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यास 500 रुपयांना गॅस सिलींडर देण्याचे आश्वासन दिले होते पण सत्ता येताच ते विसरले. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार होते, पण 5 लाख नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत म्हणूनच माता भगिनी भाजपावर विश्वास ठेवत नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या यात्रेत नबाव मलिक यांच्या समावेशाबद्दल भाजपाला आक्षेप घेण्याचे काय कारण? त्यांना दाऊद चालतो. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करता व त्यांनाच सत्तेत घेऊन अर्थमंत्रालय देता यातून भाजपाची नियत दिसते. नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या बहिणीशी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे म्हणून त्याला विरोध असेल तर मग इक्बाल मिर्चीशी संबंध असलेला व्यक्ती भाजपाला कसा चालतो, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. हा फक्त देखावा आहे, भाजपाला त्याचा काही फरक पडत नाही, असेही पटोले म्हणाले.
माजी पंतप्रधान भारत रत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त उद्या 20 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला, CWC सदस्य राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.