आम्हाला लाडकी बहीण या सरकारी योजनेचे पैसे नको, पण आमची घरे बळकावणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, अशी मागणी मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बीआयटी सेवासंघच्या समस्त महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना राख्या पाठवल्या.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळीतील महिलांनी म्हटले की, आम्हाला रक्षाबंधनाच्या औक्षणाची लाडकी बहीण योजनेच्या पैशाची ओवाळणी नको. आमची घरे बळकावण्याकरिता ज्या सुधाकर शेट्टी बिल्डरने बीआयटी चाळीचा बोगस पुनर्विकास प्रस्ताव महापालिकेत दाखल केला आहे. हा प्रस्ताव रद्द करण्याकरिता आपण महापालिका आयुक्त गगराणी यांना योग्य ते आदेश द्यावेत. तसेच शासनातर्फे योग्य धोरण राबवून आमच्या बीआयटी चाळींचा विकास करावा.