दक्षिण आफ्रिकेची विजयादशमी, तीन दिवसांतच गेम करत जिंकली मालिका

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान वेस्ट इंडीजचा 40 धावांनी पराभव करीत दोन सामन्यांची मालिका 1-0 फरकाने जिंकली. पहिली कसोटी ड्रॉ झाली होती. यजमानांचा तिसऱ्याच दिवशी ‘खेळ खल्लास’ करीत दक्षिण आफ्रिकेने विंडीजविरुद्ध सलग 10व्या कसोटी विजयाची नोंद करत आपली दशमी साजरी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा विआन मुल्डर या कसोटीचा मानकरी ठरला, तर मालिकेत 13 विकेट टिपणारा केशव महाराज ‘मालिकावीर’ किताबाचा मानकरी ठरला.

केवळ 160 धावांत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजला 144 धावांवर गुंडाळून पहिल्या डावात 16 धावांची आघाडी घेत येथेच अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 80.4 षटकांत 246 धावसंख्या उभारून विंडीजपुढे विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य दिले होते. आज कसोटीचा तिसराच दिवस असल्याने सामना निकाली निघणार, हे स्पष्ट झाले होते. वेस्ट इंडीजच्या आघाडीच्या फळीतील कोणालाच दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे 66.2 षटकांत 222 धावांवर डाव संपुष्टात आल्याने त्यांना पराभवासह मालिकाही गमवावी लागली.

कर्णधार व्रेग ब्रेथवेट (25), मायकल लुईस (4), किसी कार्टी (17), एलिक अथानाज (15) या आघाडीच्या फळीतील एक फलंदाज जरी शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला असता तर विंडीजला विजयापर्यंत पोहोचता आले असते मात्र तरीही कावेम हॉज (29), जोशुआ दा सिल्वा (27), गुडाशेक मोटी (45) व जोमेल वॅरिकन (नाबाद 25) यांनी सामन्यात रंगत निर्माण केली होती, मात्र फिरकीपटू केशव महाराजने मोक्याच्या वेळी तीन महत्त्वपूर्ण विकेट टिपल्याने दक्षिण आफ्रिकेला विजयाला गवसणी घालता आली. त्यांच्याकडून पॅगिसो रबाडानेही तीन फलंदाज बाद केले, तर विआड मुल्डर व डेन पिएड्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.