
फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपने झारखंडमध्ये आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यावर जाळे फेकले आहे. आज कोलकातामार्गे अचानक दिल्लीत दाखल झालेल्या सोरेन यांनी एक्सवर पोस्ट करत पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आणि माझ्यासमोर तीनच पर्याय खुले असल्याचे नमूद केले. दरम्यान, हल्ली पैशांसाठी कुणीही राजकारणी कुठेही जाऊ शकतो, असा टोला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लगावला.
ज्या पक्षासाठी कष्ट वेचले त्या पक्षाची हानी होईल असे काहीही करणार नाही म्हणणारे सोरेन यांनी, त्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगितले ही स्वाभिमानाला ठेच होती, तेव्हापासून आपल्याला आतून तुटल्यागत वाटत होते, असे एक्सवर हिंदीत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दिल्लीत वैयक्तिक कामासाठी आलो आहे, असे त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर सांगितले.
पक्षात अनेक अपमान आणि अवहेलना सहन केल्यावर आता आपल्याला पक्षात अस्तित्व उरलेले नाही, असे वाटत असून माझ्यासमोर तीनच पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पहिला पर्याय म्हणजे राजकारणातून निवृत्ती, दुसरा माझी स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन करणे आणि तिसरा पर्याय म्हणजे, माझ्या या वाटचालीत कुणी सोबती मिळाल्यास त्याच्यासोबत पुढचा प्रवास करणे, असे सांगत चंपई सोरेन यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी ते अन्य पक्षात प्रवेश करू शकतात, असे संकेत दिले आहेत.