पुण्यात पावसाचा दुसऱ्या दिवशीही धिंगाणा!

गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुणेकरांना सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले. काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रविवारी सायंकाळी पाच नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडेलेल्या पुणेकरांची मात्र या पावसामुळे तारांबळ उडाली.

सायंकाळी पाच नंतर सुरू झालेला पाउस एक ते दोन तास बरसत होता. सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत शिवाजीनगर भागात 34.5 मिलीमीटर पावासाची नोंद झाली. विमाननगर, नगर रोडवरील इंदिरा स्मृती सोसायटी, वडगाव शेरी येथील सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. कल्याणीनगर, संजय पार्क परिसर जलमय झाला. तारा दत्त, शिवदत्तर कॉलनीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. घोरपडी, सोपान बाग परिसरात झाडे पडली.

शहराच्या मध्यभागातील रामोशी गेट, गणेश पेठ, रास्ता पेठ परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. नरपतगिरी चौकात तळे साचले होते. नगर रोडवरील चंदननगर, खराडी या परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

मंगळवारी हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, उद्या पुणे शहरासह जिह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पुणे रेल्वे स्थानक जलमय प्रवाशांचे हाल, व्हरांड्यात पाणीच पाणी

शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकातील व्हरांड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे प्रवाशांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढून जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महिला, ज्येष्ठांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. चेंबर ब्लॉक झाल्यामुळे व रस्त्यावरील पाणी उताऱ्यामुळे स्थानक परिसरात जमा झाले. पावसाचे पाणी उतार असल्यामुळे स्टेशन परिसरातील व्हरांड्यात जमा होते. परंतु चेंबर ब्लॉक झाल्यामुळे पाणी साचून राहिले. त्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परंतु याचा कोणताही परिणाम रेल्वे सेवेवर झाला नाही.