म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाची हुबेहूब नकल करून बनावट वेबसाईट करून सदनिका जाहिरातीच्या अनुषंगाने पैसे उकळणाऱ्या दोघांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल अशी त्या दोघांची नावे असून ते दोघे एजंट आहेत. कल्पेशने बनावट जाहिरात तयार केली होती, तर अमोल हा म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवायचा. त्या दोघांनी सात जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
गोरेगाव येथे म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून एकाला बनावट संकेतस्थळावर जाऊन 50 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याला बनावट पावतीदेखील दिली. ती पावती बनावट असल्याचे लक्षात येताच त्याने म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी म्हाडाने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहाय्यक निरीक्षक अमोल उतेकर, देसाई, युनिट-5 चे भुजबळ, पाटील, युनिट-4 चे उपनिरीक्षक भिसे, युनिट-3 चे अनुभुले, बिडवे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. बनावट वेबसाईटप्रकरणी म्हाडाने तक्रार केल्याची माहिती त्या दोघांना मिळाली. त्यानंतर ते दोघे सावध झाले. ते दोघे वारंवार जागा बदलत होते. अंधेरी, भायखळा, माहीम येथे ते दर दोन तासांनी जागा बदलायचे. अखेर पोलिसांनी फिल्डिंग लावून कल्पेशच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत अमोलची माहिती मिळाली. अमोलला नालासोपारा येथून अटक केली.
डायरी ठरणार महत्त्वाची
पोलिसांनी अमोलकडून एक डायरी जप्त केली आहे. त्या डायरीमध्ये 65 जणांची नावे आहेत. तसेच अमोलकडून एक मोबाईल, 2023 ची म्हाडा सदनिका लॉटरीची झेरॉक्सदेखील जप्त केली आहे. त्या दोघांच्या बँक खात्यात किती पैसे जमा झाले होते याचादेखील तपास केला जाणार आहे. आतापर्यंत काहीजण तक्रार देण्यासाठी पुढे आले असून फसवणूक झाल्याचा आकडा वाढू शकतो. अमोलचे बारावीपर्यंत तर कल्पेशचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
बांधकामाच्या ठिकाणी व्हायच्या मीटिंग
मुंबईत ज्या ठिकाणी म्हाडाची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी ते पीडितांना तेथे सायंकाळी बोलवत असायचे. अमोल आणि कल्पेश हे दोघे एजंट असल्याने ते वारंवार म्हाडाच्या कार्यालयातदेखील जायचे. अमोल हा म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवायचा. ते पीडितांकडून ऑनलाईन तर काही रोख पद्धतीने पैसे घ्यायचे. त्या पैशातून ते बारमध्ये मौजमजा करत असायचे.
अशी सुचली बनावट संकेतस्थळाची आयडिया
अमोल आणि कल्पेश हे दोघे एजंट असल्याने त्यांना अनेक जण घरासाठी फोन करतात. म्हाडाने नुकतीच सदनिकेची जाहिरातीची घोषणा केली. त्यावरून त्या दोघांना बनावट संकेतस्थळाची आयडिया सुचली.