मुंबईकरांची काहिली आणखी वाढणार; तापमान आणखी 5 ते 6 डिग्रीने वाढणार

यंदा जुलैमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची कृपा झाली नाही. ऑगस्ट महिना संपायला आता 10 ते 12 दिवस राहिले आहेत. या दिवसांमध्ये 20 आणि पुढे 28 ते 2 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्याआधी उन्हाची काहिली आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. तापमान आणखी 5 ते 6 डिग्री सेल्सियसने वाढू शकते. सोलापूरसह अनेक जिह्यांत शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहे. सोयाबीन, मका, कांदे, तूर, मूग, उडीद या पिकांना आणि उसालाही पाण्याची प्रचंड गरज असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी 2023 मध्येही पावसाने ओढ दिली होती. जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला होता. यंदाही तशीच स्थिती दिसत असल्याचे हवामानतज्ञ आणि हवामान विभागाचे माजी वैज्ञानिक डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले. मुंबईत पावसासाठी पोषक असे वातावरण सध्या तरी दिसत नाही. यंदा ‘ला निना’सारखी स्थिती निर्माण होणार असल्यामुळे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. परंतु अशी स्थिती दिसून आली नाही, असेही त्यांनी सांगितले.

कुठे मुसळधार तर कुठे कडक ऊन

महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला नाही असे नाही. कारण काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाचा मागमूसही नव्हता. त्यामुळे पावसाचे असमान वितरण झाले. परिणामी, अनेक भागांतील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे, असेही डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले. सातारा, पुणे येथे चांगला पाऊस झाला, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार येथे पाऊस कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या आठवडाभरापासून मुंबई तापली

गेल्या आठवडाभरापासून मुंबई तापल्याचे चित्र आहे. मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले. विशेषतः दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असल्याचे दिसून येत आहे. गेला आठवडाभर आणि पुढचे चार ते पाच दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. 20 ऑगस्ट रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी पाऊस झाला नाही तर पुढे थेट 28 ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमधील 17 दिवसांपैकी केवळ पाचच दिवस पावसाचे ठरले. पुढील 48 तासांत दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात.