रुग्णालये, हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला नो एण्ट्री, सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिकेचा निर्णय

कोलकात्यात निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजत आहे. अशातच आता मुंबई महापालिका प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांत आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा फूड डिलिव्हरी बॉयला एण्ट्री देऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांसह कुणीही हॉस्पिटल आणि कॉलेजच्या आवाराबाहेरून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास ते आता मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहेत.

महापालिकेच्या प्रमुख  वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेच्या मुद्दय़ावर बैठक पार पडली. यावेळी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि मुख्य सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रुग्णालयातील असुरक्षित जागा शोधून काढणे, संभाव्य ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज निश्चित करणे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

डिलिव्हरी बॉय थेट ऑपरेशन थिएटरमध्ये

अनेक डॉक्टर रुग्णालयात आणि वसतिगृहात असताना बाहेरून खाद्यपदार्थ मागवतात. त्यामुळे अनेकदा डिलिव्हरी बॉय थेट रुग्णालयात आणि वसतिगृहात किंवा डॉक्टर ज्या वॉर्ड किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन जेवणाची ऑर्डर देताना दिसले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे अत्यंत धोक्याचे असल्याचे लक्षात आल्यावर फूड डिलिव्हरी बॉयला तत्काळ बंदी घालण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. दरम्यान, बाहेरच्या गाडय़ाही रुग्णालय, वसतिगृहाच्या आवारात उभ्या राहतात. त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या वाहनांना नव्याने स्टिकर देण्यात येऊन अन्य वाहनांची गर्दी होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.

अलार्म वाजवणार

रुग्णालयात व्हिजिटर पासची सोय करण्यात येणार आहे. तसेच रुग्णाला भेटीची वेळ निश्चित ठरवून दिली जाईल. त्याचप्रमाणे पूर्वीसारखी नातेवाईकांची रुग्णासोबत भेटीची वेळ संपल्यानंतर रुग्णालयात विशिष्ट वेळेत अलार्म वाजवला जाणार आहे. या अलार्मनंतर सर्व नातेवाईकांनी वॉर्डमधून रुग्णालयाच्या बाहेर जाण्यास सांगण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा रक्षक सर्व वॉर्डमध्ये गस्तही घालणार आहेत.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील सुरक्षेच्या दृष्टीने आता काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षकांना आता ज्या ठिकाणी गरज आहे तेथे नियुक्त केले जाणार आहे. तसेच रुग्णालयात अतिरिक्त गर्दी कशी कमी करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे.

z डॉ. नीलम अंद्राडे, संचालिका, महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय