विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून वाजतगाजत आणलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त मिंधे सरकारकडून घोर फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या योजनेचे पैसे चक्क भावांच्या खात्यात जमा झाल्याचे यवतमाळमध्ये समोर आले. या योजनेतही सरकारने असा घोळ घातल्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिंधे सरकारने बहिणींना दिलेली हीच का ओवाळणी, अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील जाफर शेख या तरुणाच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात अचानक तीन हजार रुपये आल्याचे दिसले. त्याने या योजनेसाठी अजिबात अर्ज केलेला नव्हता किंवा कागदपत्रेही दिली नव्हती. ही योजना केवळ लाडक्या बहिणींसाठी असतानाही आपल्या खात्यात त्यांच्या वाटय़ाचे पैसे आल्याने जाफर शेखला प्रचंड आश्चर्य वाटले. सरकारने आतापर्यंत 96.3 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. दोन महिन्यांच्या भत्त्यापोटी 14 ऑगस्टपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने पैसे टाकण्यास सुरुवात केली. मात्र कुठल्याही भावाने अशा योजनेसाठी अर्ज केलेला नसताना त्यांच्या खात्यात पैसे कसे जमा झाले, असा सवाल राज्यातील जनता मिंधे सरकारच्या भोंगळ कारभारावर करताना दिसत आहे.
राज्याच्या तांत्रिक विभागाकडून दखल
जाफर शेखच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचे कळताच यवतमाळच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी त्यांच्या कार्यालयाद्वारे याबाबतची तक्रार राज्याच्या तांत्रिक विभागाकडे अधिक तपासासाठी पाठवली. जाफर शेखने तब्बल 12 वर्षांपूर्वी बँकेत खाते उघडले होते, परंतु बऱ्याच कालावधीपासून व्यवहारच न झाल्याने हे खाते कार्यरत नव्हते. आपल्या खात्यात तीन हजार रुपये आल्याचा मेसेज शेखला आल्यानंतर त्याला आश्चर्य वाटले. त्याने बँकेत जाऊन चौकशी केली असता हे पैसे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे असल्याचे दिसले. अनेक महिलांना या योजनेसाठी कागदपत्रे देताना अनेक अडचणी येत आहेत. असे असताना पैसे भावांच्या खात्यात जातातच कसे, असा सवाल आता बहिणींनी केला आहे.
आधार कार्डाच्या माहितीमुळे गफलत
प्रथमदर्शनी आधार कार्डावरील चुकीच्या माहितीमुळे ही गफलत झाल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अधिकारी पत्की यांनी केला. नक्की कुणाच्या खात्याची चुकीची माहिती आली याबाबत संपूर्ण तपास करण्यात येईल, असेही ते म्हणाले. एका महिलेच्या आधार कार्डावरील शेवटचे चार क्रमांक जाफरच्या आधार कार्डावरील क्रमांकांशी मॅच झाले. त्यातच हा घोळ झाला. ज्या महिलेला पैसे मिळालेले नाहीत तिला ते त्वरित मिळावेत या दृष्टीने पुढील हालचाली करण्यात येतील, असेही ते म्हणाले.